माहेश्वरी गटाने काँग्रेस सोडली : भाजपा-परिवर्तन आघाडीची स्थापना उमरखेड : नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण सध्या तापले असून रोज नवनवीन उलथापालथ शहरात होत आहे. काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केलेल्या भारत खंदारे हा उमेदवार मान्य नसल्याचा आरोप करुन काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सुरेशचंद्र माहेश्वरी यांनी बंड पुकारले. व भाजपासोबत आघाडी केली. ही माहिती आमदार राजेंद्र नजरधने यांनी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली. त्यामुळे उमरखेड नगरपालिकेच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्व. जेठमलजी माहेश्वरी हे नगराध्यक्ष व माजी आमदार होते. त्यानंतर सलग ११ वर्ष त्यांचे पूत्र सुरेशचंद्र माहेश्वरी यांनी नगराध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले. माहेश्वरी परिवार आतापर्यंत काँग्रेसमध्ये होता. परंतु यावेळी नगराध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसने भारत खंदारे यांना जाहीर केले. यावरून उमरखेड काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. काँग्रेसमधील माहेश्वरी गटाने आपली परिवर्तन आघाडी निर्माण करून भाजपासोबत युतीची घोषणा केली. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये भूकंप निर्माण झाला आहे. यासंदर्भात बुधवारी दिवसभर बैठका झाल्या. भाजपाचे आमदार राजेंद्र नजरधने आणि माजी आमदार उत्तमराव इंगळे यांनी परिवर्तन आघाडीसोबत चर्चा करून दोघांनी एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरविले. त्यानुसार सायंकाळी माजी नगराध्यक्ष सुरेश माहेश्वरी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात येऊन आमदार नजरधने यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टीच्याच चिन्हावर लढणार असून त्यांचे नगरसेवक पदाचे उमेदवारही याच चिन्हावर लढतील, मात्र माहेश्वरी गटाचे परिवर्तन नावाने लढणार असल्याचे सांगितले. २४ जागेसाठी व नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पत्रकार परिषदेला नितीन माहेश्वरी, महेश काळेश्वरकर, नितीन भुतडा, अॅड. संतोष जैन, सुनील मुडे, दिलीप सुरजे आदींची उपस्थिती होती. बुधवारच्या या घडामोडींमुळे शहरातील राजकारणाने वेगळेच वळण घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. (शहर प्रतिनिधी)शहरात विविध चर्चांंना उधाणउमरखेड नगरपरिषदेसाठी लवकरच निवडणूक होऊ घातली आहे. त्या दृष्टीकोणातून प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असताना ऐनवेळेवर शहर काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले. दिवसभर सर्वत्र नगरपरिषद निवडणूक व राजकीय चर्चा होती. माहेश्वरी कुटुंबीय काँग्रेसचे निष्ठावंत असून गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षात कार्यरत आहे. असे असताना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार परस्पर जाहीर केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करून परिवर्तन आघाडीची घोषणा केली. एवढ्यावरच न थांबता भाजपासोबत युती जाहीर केली. या सर्व घडामोडींचा शहर काँग्रेसला नगरपरिषद निवडणुकीत फटका बसू शकेल, अशी चर्चा सुरु आहे.
काँग्रेसला उमरखेडमध्ये खिंडार
By admin | Updated: October 27, 2016 01:01 IST