चाय की चर्चा : दिग्विजय सिंग, राज बब्बर, अशोकराव चव्हाण येणारयवतमाळ : दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाने देशभर चर्चेत आलेल्या आर्णी तालुक्यातील दाभडी या गावाच्या वाटेवर १६ जून रोजी काँग्रेसने ‘चाय की चर्चा’ या आंदोलनाचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते खासदार दिग्विजय सिंग, खासदार तथा सिने अभिनेता राज बब्बर, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा ब्रार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम आदी मंडळ या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव कासावार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके यांच्या उपस्थितीत या आंदोलनाची माहिती देण्यात आली. १६ जून रोजी आर्णी येथे दाभडी मार्गावरील बालाजी जिनिंगमध्ये सकाळी ११ वाजता हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाबाबत माहिती देताना मोघे, कासावार, पुरके यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी दाभडीमध्ये ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन गेले. या चर्चेतून त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना संबोधित करताना आत्महत्या करू नका, भाजपाची सत्ता येताच सर्व काही ठीक होईल, असा विश्वास दिला होता. मात्र प्रत्यक्षात मोदींच्या या ‘चाय पे चर्चा’नंतर दाभडी गावातच प्रकाश दमडू राठोड, विठ्ठल सवाई जाधव, बाबुसिंग राठोड या तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी नेमके काय केले आणि शेतकऱ्यांची वास्तव स्थिती काय आहे, यावर काँग्रेसच्या ‘चाय की चर्चा’ या आंदोलनातून प्रकाश टाकला जाणार आहे. मोदींनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले.लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश यवुक काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन असल्याचे कासावार यांनी सांगितले. पत्रपरिषदेला माजी आमदार विजयाताई धोटे, शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, आर्णीचे नगराध्यक्ष आरीज बेग, अशोक बोबडे, भारत राठोड, अरुण राऊत, अनिल गायकवाड, दिनेश गोगरकर आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
दाभडीच्या वाटेवर काँग्रेसचे आंदोलन
By admin | Updated: June 10, 2016 02:31 IST