यवतमाळ : जिल्ह्यात काँग्रेस पूर्णत: मोडकळीस आली आहे. येथील पक्ष व कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याची व नवसंजीवनी देण्याची गरज असून हे काम तुम्हीच करू शकता, तुम्हीच आमचे दिल्लीपर्यंत नेतृत्व करा, अशा शब्दात जिल्ह्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी खासदार विजय दर्डा यांना साकडे घातले. सोमवारी ‘दर्डा उद्यान’ येथे काँग्रेस नेत्यांनी विजय दर्डा यांची भेट घेतली. सुमारे चार तास काँग्रेसचे हे नेते तेथे होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा परिषद तथा जिल्हा महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती देताना शिवाजीराव मोघे म्हणाले, आम्ही सर्व नेते विजय दर्डा यांना भेटलो. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या मतभेदांची माहिती त्यांना दिली. जिल्ह्यातील गटबाजी मिटविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा, पक्षातील मतभेद दूर करण्यासाठी मध्यस्थी करावी, तुम्हीच संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करावे, दिल्लीपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील, अशी विनंती केल्याचे मोघे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. संजय देशमुख ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेसचे काहीच खरे नाही, नेत्यांची चुकीची धोरणे त्यासाठी कारणीभूत आहे. पदे सोडण्यासाठी कुणी तयार नाही. प्रत्येक जण वैयक्तिक स्वार्थ पाहत आहे. काँग्रेसमध्ये चांगले काही होईल म्हणून आपण या पक्षात आलो. मात्र येथील विस्कळीत भूमिका, संकुचीत वृत्ती व कुणीच कोणासोबत नसल्याचे चित्र पाहून आपण अपक्षच बरे होतो, असे वाटायला लागले आहे. त्यामुळेच जिल्ह्याचे नेतृत्व विजय दर्डा यांनी करावे, पक्षात जातीने लक्ष द्यावे, वेळ द्यावा यासाठी विनंती करण्यात आली. तुम्ही ठरवाल ते आम्हाला मान्य राहील, प्रत्येक गोष्ट आम्ही तुमची ऐकू अशा शब्दात दर्डा यांना विनंती करण्यात आल्याचे संजय देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस जीवंत होत आहे, जिल्हा परिषद, बँक व अन्य संस्थांमध्ये या पक्षात वर्दळ दिसत आहे. काँग्रेस नेत्यांच्या चुकीच्या धोरणामुळे ही वेळ आल्याचा आरोप संजय देशमुख यांनी केला. विजय दर्डा देतील तो जिल्हाध्यक्ष आम्हाला मान्य राहील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार म्हणाले, आम्हाला विरोधकांशी लढायचे आहे पक्षांतर्गत नाही. त्यामुळेच आपसातील मतभेद मिटविणे आवश्यक आहे. गटबाजी संपुष्टात आणून पक्ष संघटक मजबूत करणे, काँग्रेसला चांगले दिवस आणणे यासाठी विजय दर्डा यांनी पुढाकार घेणे, नेतृत्व करणे गरजेचे आहे. पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही विजय दर्डा यांना दरमहा एकत्र बसण्याची विनंती केली आणि त्यांनीही ती तत्काळ मान्य करून वेळात वेळ काढून यवतमाळला सोबत बसत जाऊ असा शब्द दिल्याचे कासावार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या बैठकीला उपस्थित असलेल्या संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या, निवडणुकांमध्ये पराभव झाला आता काँग्रेसचे पुढे काय यावर आम्ही विजय दर्डा यांच्याशी चर्चा केली. आगामी काळात तेच जिल्ह्याचे काँग्रेसचे नेतृत्व करणार असून तेच सर्व गटा-तटांना एकत्र आणू शकतात. म्हणूनच आम्ही सर्वांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून जिल्ह्यात जाणीवपूर्वक लक्ष देण्याची विनंती केल्याचे सव्वालाखे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)नव्या जिल्हाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणीकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून खासदार अशोक चव्हाण यांची वर्णी लागल्यानंतर पक्षात नव्या टीमचे वेध लागले आहे. त्यातूनच यवतमाळचेही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलविण्याची तयारी सुरू आहे. माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी आपले ‘नांदेड कनेक्शन’ दाखविण्याचा व त्यातूनच आपल्या मर्जीतील जिल्हाध्यक्ष बनविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या या प्रयत्नांना तीव्र विरोध चालविला आहे. जिल्हाध्यक्ष कुणीही बनवा मात्र तो सर्वसंमतीने ठरविला जावा, कोणत्याही एका विशिष्ट गटाचा असू नये, अशी भूमिका आम्ही काँग्रेस नेत्यांनी खासदार विजय दर्डा यांच्यापुढे मांडल्याचे शिवाजीराव मोघे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
काँग्रेस नेत्यांचे विजय दर्डा यांना साकडे
By admin | Updated: April 23, 2015 02:10 IST