भवितव्यावर चर्चा : नवी टीम, अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या प्रभावाचा मेन्यूयवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेते-पदाधिकाऱ्यांना गटबाजीने पोखरले असताना गेल्या कित्येक वर्षांनंतर येथील पाच प्रमुख नेते जेवणासाठी का होईना एकत्र बसल्याने राजकीय गोटात चर्चेचा विषय आहे. नेत्यांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’त नेमके काय शिजले, याचा अंदाज बांधला जात आहे.दारव्हा रोडवरील एका हॉटेलात गुरुवार, २ एप्रिल रोजी रात्री ही भोजन-बैठक झाली. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, माजी राज्यमंत्री संजय देशमुख आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार या पाच नेत्यांची ही बैठक झाली. विशेष असे, या बैठकीतून आपल्या कोणत्याही निकटस्थ कार्यकर्ते, पीएला दूर ठेवण्यात आले होते. ‘नेते केवळ जेवणासाठी गेले होते’ एवढे सहज वर्णन त्यांच्या निकटवर्तीयांकडून केले जात असले तरी प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. या बैठकीत पाचही प्रमुख नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केल्याची माहिती आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलले. ते आता राज्यात आपली नवी टीम तयार करणार. या टीममध्ये जिल्ह्यातून कुणाचा समावेश करावा, त्यांनी चेंज सुचविल्यास नवा जिल्हाध्यक्ष कोण असावा, यावर चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या गोटात सध्या शांतता दिसत असली तरी भविष्यात त्यांच्या राजकीय हालचाली वाढण्याची चिन्हे आहेत. ते पाहता कोणत्याही परिस्थितीत मैदानात राहून राष्ट्रवादीला ‘चेक’ देण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आल्याचे सांगण्यात येते.जिल्ह्यात काँग्रेसमध्ये अनेक गट पाहायला मिळतात. नेत्यांमधील या गटबाजीने कार्यकर्तेही विभागले गेले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या गटबाजीचा फटका बसला. काँग्रेसच्या ताब्यातील पाचही जागा निघून जाण्यामागे अनेक कारणांपैकी गटबाजी हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण ठरले. मात्र त्यानंतरही ही गटबाजी नियंत्रणात आली नाही. त्यातील भांडणे अलीकडे दिल्ली, मुंबईपर्यंत पोहोचली नाहीत, एवढेच. मात्र खासगीत संधी मिळेल तेव्हा श्रेष्ठींकडे आपल्या विरोधी गटाचा काटा काढण्यात कुणीही कसर ठेवली नाही. आतापर्यंत केवळ पक्षाच्या बैठकीच्यावेळी एका ठिकाणी दिसणारे आणि तेथून निघताच एकमेकांकडे पाठ करून फिरणारे जिल्ह्यातील प्रमुख पाच नेते जेवणाच्या टेबलवर एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)वर्चस्व कायम ठेवण्याचा खटाटोप जिल्हा काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांची साठमारी झाली होती. पक्षातील प्रवाहच संपुष्टात आणला होता. नेते मंडळी आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचेच पूत्र निवडणूक रिंगणात उतरविण्याची धडपड सुरू होती. आपल्याच कुटुंबातील व्यक्तीचे राजकीय पुनर्वसन व्हावे, असा प्रयत्न काँग्रेसच्या सर्वच स्थानिक नेत्यांकडून कमी-अधिक प्रमाणात करण्यात आला. परिणामी पक्षासाठी धडपडणारा कार्यकर्त्याच दूर गेला. केवळ नेत्यांची फौज असलेला पक्ष अशी ओळख निर्माण झाली. त्याचा परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून दिसून आला. आतासुद्धा ही नेते मंडळी पराभव स्वीकारायला तयार नाही. पक्षातील नव्या नेतृत्वाला संधी देण्याऐवजी अस्तित्वात येणाऱ्या कार्यकारिणीवर आपले वर्चस्व कसे कायम राखता येईल, याचा खटाटोप केला जात आहे. आज विरोधक म्हणून पक्ष सक्रिय होताना दिसत नाही. काही निवडक पदाधिकाऱ्यांना घेऊन निवेदन देण्यापुरताच उपक्रम राबविला जात असल्याचे चित्र आहे.
काँग्रेस नेत्यांची ‘डिनर डिप्लोमसी’
By admin | Updated: April 4, 2015 23:53 IST