‘चाय पे चर्चा’चे स्मरण : भाजपाची सारवासारव लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाभडी गावासाठी काहीच केले नाही, याचे स्मरण करून देण्यासाठी काँग्रेसची नेते मंडळी बुधवारी दिल्लीला रवाना झाली. तर इकडे दाभडीतील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी भाजपाचे मंत्री, आमदार दाभडीत पोहोचल्याने तेथे विसंगत राजकीय चित्र पहायला मिळाले. तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी या गावातून देशभरातील शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून संवाद साधला होता. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, भाजपाची सत्ता दिल्यास शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील, असे मोदींनी आश्वस्त केले होते. मोदी देशाचे पंतप्रधान झाले. शेतकरी व जनतेने त्यांना एकहाती सत्ता दिली. परंतु आजही शेतकरी उपेक्षितच आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचे वार त्याच्यावर सुरू आहे. शेतकरीच नव्हे तर मोदींनी जेथून संवाद साधला ते दाभडी गावही तीन वर्षानंतरसुद्धा उपेक्षित आहे. तीन वर्षानंतर दाभडीची स्थिती पूर्वीप्रमाणे कायम आहे. याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार व भाजपाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे दिल्लीत धडकणार आहेत. तेथे १८ मेच्या सायंकाळपासून जंतर-मंतरवर काँग्रेस धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनासाठी बुधवारी काँग्रेसचे कार्यकर्ते यवतमाळातून दिल्लीसाठी रवाना झाले. काँग्रेसच्या या आंदोलनाची ‘चर्चा’ झाल्याने भाजपाने दोन-तीन दिवसांपासूनच सारवासारव सुरु केली होती. अपेक्षेनुसार भाजपाने दाभडीत बुधवारी विकास कामांचे भूमिपूजन केले. त्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थित होते. दाभडीचे वास्तव दाखविण्यासाठी काँग्रेसवाले दिल्लीत गेले आणि भाजपावाले दाभडीत आल्याच्या या प्रकाराची जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा आहे. नरेंद्र मोदींच्या घोषणेकडे लक्ष वेधण्यासाठी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसने दाभडीतच ‘चाय की चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता. भाजपाने त्यावेळी दाभडी गावावर विकासाचा फोकस निर्माण करू, असे सांगितले होते. हे गाव दत्तक घेण्याची घोषणाही केली गेली होती. मात्र प्रत्यक्षात काहीही झाले नाही. दाभडीतील भूमिपूजन कार्यक्रमात या गावाचा किती व कसा विकास केला आणि करणार हे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेते मंडळींनी केला.
काँग्रेस दिल्लीत, भाजपा दाभडीत
By admin | Updated: May 18, 2017 00:45 IST