दिग्गज आमदारांवरही आत्मचिंतनाची वेळ
यवतमाळ : जाती-पातीची आकडेमोड करून राजकारणाचे गणित मांडले जात होते. यवतमाळ जिल्ह्यात सर्वच आराखडे आतापर्यंत जातीय समीकरणावरच आखले होते. यात बरेचदा विकासाच्या मुद्याला बगलही देण्यात येत होती. यवतमाळ-वाशिम लोकसभेतील निकालाने संपूर्ण जातीय समीकरणालाच छेद दिला आहे. बंजारा आणि कुणबी-मराठा मतदार कुणाच्या बाजूला वळते यावर विजयाचे गणित मांडले जात होते. तर काँग्रेसच्या गोटातून मुस्लीम, आदिवासी, दलित मतांची गोळा बेरीज करण्यात येत होती. निवडणुकीच्या शेवटच्या चरणात हाच एक मुद्दा हाती घेऊन प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. जाहीर सभांमध्ये थेट शिवाजीराव मोघे यांचा बंजारा समाजातील मानसपूत्र म्हणून उल्लेख करण्यात आला. आज निकाल हाती आल्यानंतर जातीपातीच्या संख्येवरून जी विजयाची शिडी तयार केली जात होती त्यात सपशेल अपयश आल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या भावना गवळी यांनाही कुण्या एका जातीच्या पाठिंब्यामुळे मताधिक्य मिळाले हे सांगण्याचे धारिष्ठ्य आज कुणीच करणार नाही. या सर्व आराखड्यांना छेद देण्याचे काम १६ मे रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निकालाने केले आहे. राजकारणाला जातीय रंग देणार्यांची मतदारालाही ओळख पटली आहे. काँग्रेसचे मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार वसंत पुरके, वामनराव कासावार, नंदिनी पारवेकर यांनी आपल्या कार्यशैलीत सुधारणा केली नाही. शेवटच्या दिवसात जनतेपुढे गेल्यानंतर त्यांचे रुसवे फुगवे, नाराजी सहज दूर करता येते, या भ्रमातच येथील काँग्रेसचे दिग्गज राहिले. तर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनाही मोदी लाट असताना विशेष लिड आपल्या मतदारसंघातून देता आली नाही. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रणनिती बदलविण्यासाठी लोकसभेचा निकाल सूचक ठरणारा आहे. शिवसेनेच्या भावना गवळी यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.