थकीत कर वसुली : घाटंजी नगरपरिषदेची धडक मोहीम घाटंजी : लाखो रुपयांच्या थकीत कर वसुलीप्रकरणी वारंवार सूचना देवूनही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर शुक्रवारी नगरपरिषदेने कठोर भूमिका घेत येथील दोन जिनिंगवर भूखंड जप्तीची कारवाई केली. कारवाई झालेल्या जिनिंगमध्ये बिर्ला कॉटन सिन इंडिया लि. (आंबेडकर वॉर्ड घाटंजी) व राणा कॉटन (दुर्गा माता वॉर्ड, घाटंजी) या दोन जिनिंगचा समावेश आहे. आतापर्यंतच्या नगरपरिषदेच्या कार्यकाळातील जप्तीची ही पहिलीच कारवाई आहे. बिर्ला कॉटनकडे ११ लाख दोन हजार ८०५ रुपयांचा कर थकीत आहे. त्यासाठी त्यांचा एक लाख ८६ हजार चौरस फुटाचा खुला भूखंड जप्त करण्यात आला. तसेच राणा कॉटनकडे पाच लाख १८ हजार ६३८ रुपये करापोटी थकीत आहे. त्यांनी हा कर न भरल्याने त्यांच्या मालकीचा एक लाख ६२ हजार ४४८ चौरस फुटाचा भूखंड जप्त करण्यात आला. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, १९६५, कलम १५५(ड)(१) अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार ही कारवाई करण्यात आली. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्याधिकाऱ्यांच्यावतीने कर निरीक्षक भगवान बन्सोड यांच्या नेतृत्त्वातील पथकाने ही कारवाई केली. या पथकात कर वसुली लिपिक गजानन बुक्कावार, कंत्राटी अभियंता रोशन तायडे, आरोग्य निरीक्षक संजय दिडशे, केमिस्ट धीरज जाधव, लिपिक विक्की शेंद्रे, के.के. खान, दत्ता पेठेवार, शिपाई अशोक गोडे, पुरुषोत्तम सातघरे, ट्रॅक्टरचालक भिकाजी गवळी आदींचा समावेश होता. या कारवाईमुळे थकबाकीदारांबद्दलची नगरपालिकेची कठोर भूमिका स्पष्ट झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
दोन जिनिंगवर जप्ती
By admin | Updated: February 18, 2017 00:13 IST