नांदेपेरा : लोकसहभागातून वनांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक गावात वनसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या़ मात्र या समित्या हल्ली कागदावरच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे़नांदेपेरा, सोनापूर, लाखापूर या गावाला लागून झुडपी जंगल आहे़ या जंगलातील वृक्षांची राजरोसपणे कत्तल केली जात आहे़ काहींनी जंगलावर अतिक्रमण करून शेती वहिती केली आहे़ त्यामुळे हे जंगल पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ काही अतिक्रमणधारकांनी अधेमधे कुठेही जंगलतोड करून शेती वहिती केली आहे़ त्यामुळे जनावरांना चाराही शिल्लक राहिला नाही़ काही चारा शिल्लक आहे, मात्र तेथपर्यंत जनावरांना जाण्याकरिता रस्ता नाही़ त्यामुळे अतिक्रमणधारक व गुराख्यांमध्ये नेहमीच वाद होत आहेत.जंगलावर नेमकी मालकी कुणाची, असा प्रश्न आता जनावर मालकांना पडत आहे़ गुराख्यांनी चारा नसल्यामुळे गुराखीपणा सोडून दिला आहे़ त्यामुळे काही शेतकऱ्यांनी चाऱ्याअभावी व गुराखी जनावरांची राखन करीत नसल्याने बाजारात जनावरांची विक्री करणे सुरू केले आहे़ दरम्यान या सर्व घटनकांची वन विभागाला तातडीने माहिती मिळावी, याकरिता वन संरक्षण समित्या स्थापन करण्यात आलया आहेत. मात्र जे ग्रामस्थ वन संरक्षण समितीत सदस्य आहेत, त्यांना आपले कर्तव्य काय आहे, याचीच कोणतीही कल्पना नाही़ या समित्यांना अनेक अधिकार असताना सदस्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीवच करून देण्यात आली नाही़ त्यामुळे समित्या केवळ कागदोपत्री असून या समित्या नावापुरत्याच उरल्या आहे. वन संरक्षण समित्या कागदावरच राहिल्याने वने संकटात सापडली आहे़ वन विभागाचे कर्मचारीही कुंभकर्णी झोपेत असून वनांच्या संरक्षणाची जबाबदारी असताना ते कोणतीही कारवाई करताना दिसत नाही़ नांदेपेरा लगतच मच्छिंद्रा या गावाला लागलेलया जंगलात मौल्यवान झाडे आहेत़ त्यांची कत्तल होत आहे. रात्री तोड होत असताना वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे़ (वार्ताहर)
वने सोडली वाऱ्यावर समित्या कागदावरच
By admin | Updated: November 25, 2014 23:04 IST