सीईओंचे निर्देश : बीडीओंकडे दिली जबाबदारीयवतमाळ : आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत. १८ डिसेंबरला बोलावलेल्या बैठकीत त्यांनी बीडीओंवर या प्रश्नांच्या सोडवणुकीची जबाबदारी सोपविल्याची माहिती नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेने दिली.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी शहापूरकर, सहायक लेखा अधिकारी सुने, डाफे, अधीक्षक प्रदीप तिखे उपस्थित होते. नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तालुका स्तरीय समिती गठीत करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तालुका आरोग्य अधिकारी, प्रत्येक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी व सहायक लेखा अधिकाऱ्यांचाही समितीत समावेश असेल. समितीने कर्मचारीनिहाय सहाव्या वेतन आयोगाचे थकबाकीचे हप्ते, कालबद्ध-आश्वासित पदोन्नतीची थकबाकी, अंशदान सेवानिवृत्ती योजनेत समाविष्ट कर्मचाऱ्यांचा खातेनिहाय तपशिल, त्यांचे कपात झालेल्या रकमेचे विवरण व सहाव्या वेतन आयोगानुसार थकबाकी, कालबाह्य देयके याबाबत आढावा घेऊन ३० तारखेला गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली जाणार आहे.पंचायत समितीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवापुस्तके दिली, परंतु त्यात योग्य त्या नोंदी घेण्यात आल्या नाही. त्यांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील नोव्हेंबरचे वेतन रखडल्याप्रकरणी जबाबदार कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले. त्यामुळे २१ डिसेंबरचे आंदोलन संघटनेने स्थगित केले. या बैठकीला नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एम. ए. कय्यूम, सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, शुभांगी गावंडे, पुरुषोत्तम शेणमारे, अनंता सावळे, दिलीप गोल्हर, हेमलता वैद्य, कल्पना शामसुखा, रुपेश खापर्डे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी समिती
By admin | Updated: December 21, 2015 02:45 IST