अशोक काकडे - पुसद विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत नाही तोच पुसद तालुक्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. ३१ डिसेंबरपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश प्राप्त झाल्याने निवडणूक प्रक्रियेच्या हालचालींना वेग आल आहे. गावागावात आता सहकारी संस्था कशा काबीज करता येतील, याकडे पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे. शासनाने सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण स्थापन केले आहे. त्यांच्याच आदेशाने या निवडणुका होत असून ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार सहकारी संस्थांच्या कायदा व नियमांमध्ये मोठे बदल झाल्याने या निवडणुकीला वेगळेच महत्व आले आहे. यंदा प्रथमच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून ती संस्थेच्या कार्यक्षेत्रापुरतीच लागू राहणार आहे. सभासदाची अर्हता दि. ३१ आॅक्टोबर २०१४ निश्चित केली आहे. त्यांनाच मतदानाचा अधिकार राहणार आहे. सभासद हा थकबाकीदार असल्यास मतदानास अपात्र राहील. पुसद तालुक्यात एकूण तीन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. प्राधिकरणाने संस्थेच्या अ, ब, क, ड या पद्धतीने वर्गीकरण केले आहे. पुसद तालुक्यात ६८ संस्थांची निवडणूक प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात ड प्रवर्गात येणाऱ्या संस्थांची निवडणूक घेतली जाणार आहे. या प्रवर्गामध्ये १३ संस्थांचा समावेश आहे. त्यात २०० पेक्षा कमी सदस्य असलेल्या संस्थांचा समावेश राहणार आहे. क प्रवर्गात २९ सहकारी संस्थांंचा समावेश आहे. ब वर्गामध्ये २६ संस्थांचा समावेश असून पुसद तालुक्यातील अ वर्गाची कोणतीही संस्था निवडणुकीस पात्र नाही. निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवारास खर्चाचा हिशेब देणे बंधनकारक आहे. खर्चाची मर्यादा तालुका क्षेत्रासाठी ५० हजार रुपये तर गाव पातळीवरील संस्थेसाठी २५ हजार आहे. सर्व सहकारी संस्थांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि बिगर कर्जदार मतदारसंघ यंदा वगळण्यात आले आहे. त्यामुळे दोन सभासद कमी होणार आहे. सर्व सहकारी संस्थांमध्ये अनुसूचित जाती जमाती एक, इतर मागासप्रवर्ग एक, भटक्या विमुक्त जाती आणि विशेष मागासप्रवर्ग एक, महिला दोन अशी राखीव पदे भरणे अनिवार्य राहील. सर्वसाधारण गटातून संस्थेच्या पोटनियमानुसार संचालकांची निवड करण्यात येईल. मतदान करतेवेळी मतदाराकडे निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या ओळखपत्राप्रमाणेच या निवडणुकीमध्ये ओळखपत्र दाखविल्याशिवाय मतदान करता येणार नाही. तालुकास्तरावर निवडणूक घेण्यासाठी तालुका सहकार अधिकारी म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती सहायक निबंधक जी.एन. नाईक यांनी दिली आहे.सहकारी संस्थांच्या निवडणुकांतून एक संचालक बँक प्रतिनिधी म्हणून निवडला जातो. त्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार राहणार आहे. यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले असून सर्वच राजकीय पक्षामध्ये या निवडणुकींवरून चुरस दिसत आहे.
‘सहकार’ची रणधुमाळी
By admin | Updated: November 11, 2014 22:49 IST