जिल्हा परिषद अध्यक्षांनी अनुभवले वास्तव : मनपूर, किन्ही, भांब, हिवरीतील प्रकारयवतमाळ : ग्रामीण आरोग्य सेवेवर शासनाकडून कोट्यवधीचा खर्च केला जातो. प्रत्यक्षात याचा ग्रामीण जनतेला कोणताच फायदा नाही. आरोग्य यंत्रणा केवळ कागदोपत्री उपाचार करत असल्याचा जळजळीत अनुभव जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांना आला. जिल्हा मुख्यालयापासून अगदी जवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात-उपकेंद्रात एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हता. इतकेच काय तर, या केंद्रामध्ये उपचार कक्षात प्रचंड धूळ साचली होती. यावरून येथे महिन्याभरात अपावादनेच तपासणी झाली असावी, हे स्पष्ट झाले. यवतमाळ तालुक्यातील आर्णी मार्गावर असलेल्या किन्ही उपकेंद्राला सकाळी ९.३० वाजता अध्यक्षांनी भेट दिली. येथे कुलूप लागले होते. परिचारिका भगत आणि भरणे या दोघीही गैरहजर होत्या. त्यानंतर अध्यक्षांनी मनपूर उपकेंद्र गाठले. तेथेही परिचारिका कुनगर आणि शेलारे या दोघी गैरहजर होत्या. या उपकेंद्रात एकही प्रसूती झाली नाही. आरोग्य कर्मचारी गावात पंधरा दिवसातून एकदा येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दुर्दैवी बाब म्हणजे मनपूर येथे सलग दोन माताचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यानंतरही या आरोग्य केंद्राची यंत्रणा ताळ््यावर नाही. मनपूर येथून हिवरी आरोग्य केंद्राची पाहाणी केली. येथे शिकाऊ डॉक्टर उपस्थित होते. येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. नागभिडकर, तंत्रज्ञ खडतकर, संजीव मडावी, डी.एल. दौलतकर हे सर्व अधिकारी, कर्मचारी गैरहजर होते. या आरोग्य केंद्रात महिन्यात एक किंवा दोन प्रसूती झाल्याचे आढळून आले. १३ दिवसात येथे एकही रुग्ण तपासण्यात आला नाही. यापुढे भांबराजा उपकेंद्राची स्थिती अतिशय धक्कादायक आहे. तेथे प्रसूती कक्षात प्रचंड धूळ साचलेली होती. तेथील एनएम कांबळे गैरहजर होत्या. पाणी नसल्याने घाण साचल्याचे येथील कर्मचाऱ्याने सांगितले. प्रत्यक्षात उपकेंद्रातील हापसीला पाणी असल्याचे आढळून आले. येथे मागील महिनाभरात एकही रुग्ण तपासण्यात आला नाही. हे वास्तव पाहिल्यानंतर अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची बैठक बोलावली. गैरहजर असलेल्या व कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. विशेष म्हणजे यापूर्वीसुध्दा हिवरी आरोग्य केंद्राला सीईओ आणि अध्यक्षांनी भेट दिली होती. तेव्हा कारवाई करण्याचा प्रस्ताव अध्यक्षांनी दिला. मात्र याची दखल सीईओंनी घेतली नाही. आताही या आरोग्य केंद्राची स्थिती सुधारली नाही. त्यामुळे सीईओ दीपक सिंगला हे कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतील काय, याकडे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
आरोग्य केंद्र-उपकेंद्रात कागदोपत्रीच उपचार
By admin | Updated: June 15, 2016 02:49 IST