कामकाज ठप्प : जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचा पुढाकार यवतमाळ : जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने शुक्रवारपासून राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात जिल्हा परिषदेतील लिपीकवर्गीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शुक्रवारी कामकाज ठप्प पडले होते. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. संबंधित मंत्र्यांनी संघटनेसोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार अद्याप कारवाई केली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेने लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड-पेमध्ये सुधारणा करणे, प्रशासकीय बदल्यांबाबतचे अन्यायकारक धोरण रद्द करणे, जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचा जॉब चार्ट, कर्तव्य सूची निश्चित करावी, त्यांच्या पाल्यांना सर्व स्तरावर निशुल्क शिक्षण सवलत मिळावी, अतिकालीन भत्ता मिळावा, पदोन्नतीधारकास वरिष्ठ पदाचे वेतन मिळावे, एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेसाठी ४५ वर्षांपर्यंत सवलत मिळावी, आदी मागण्या केल्या आहेत. या मागण्यांसाठी यापूर्वी लाक्षणीक उपोषण करण्यात आले. तत्पूर्वी शासनाला निवेदने पेदण्यात आली. ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे, अर्थ व ग्राम विकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात बैठकही घेतली. त्यांनी संघटनेच्या मागण्या रास्त असून योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. मात्र प्रत्यक्षात अद्याप मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे संघटनेने राज्यव्यापी बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र बुटके यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा परिषदेतील ९९ टक्के कर्मचारी आंदोलन सहभागी असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान उमरखेड पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे. नेर येथे निवेदन नेर - स्थानिक पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनात सहभाग नोंदवित गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे यांंना निवेदन दिले. यावेळी नीलेश वैरागडे, अरविंद नंदागवळी, तुळशीराम पजगाडे, सुनील ठाकरे, एस.पी. गुजर, एस.पी. नाईक, एम.आर. कांबळे, व्ही.टी. गौरकार, टी.पी. बसवनाथे, जी.एन. चव्हाण, अनुराग हिरुळकर, जी.एम. सहारे, व्ही.डी. इंगोले उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
लिपिकांचे लेखणी बंद आंदोलन
By admin | Updated: July 16, 2016 02:49 IST