शुक्रवारी निवड : नगरपरिषदेवर सर्वपक्षीय सत्तेची शक्यतावणी : येथील नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती पदांसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. तूर्तास मनसेचे नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष असल्याने समिती सभापती पदांवरही त्यांचा डोळा आहे. मात्र यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक विविध पदांवर आरूढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.येथील २५ सदस्यीय नगरपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सर्वाधिक आठ सदस्य आहे. त्या खालोखाल सात अपक्ष नगरसेवक आहे. राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचे तीन, काँग्रेसचे दोन, तर भाजपाचा एक नगरसेवक आहे. मागीलवर्षी सभापती पदांवरून प्रचंड रणकंदन झाले होते. प्रथम डिसेंबरमध्ये एक सभापती निवडण्यात आले. इतर पदांचा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला होता. त्यानंतर जानेवारीत इतर सभापतींची निवड झाली होती. त्यात धनराज भोंगळे, विजय नागपुरे आणि कीर्ती देशकर चार विरूद्ध तीन मतांनी विजयी झाले होते, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी मंदा पुसनाके व उपसभापतीपदी अर्चना ताजने अविरोध विजयी झाल्या होत्या.गेल्या वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आता नगरपरिषदेत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले आहे. या दोनही पदांच्या निवडीत केवळ शिवसेनेचे तीन सदस्य तटस्थ होते. उर्वरित सदस्यांनी बाजूने आणि विरोधात भूमिका बजावली होती. सध्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद मनसेकडे, बांधकाम सभापतीपद अपक्षाकडे, आरोग्य व जलपूर्ती सभापतीपद राष्ट्रवादीकडे, महिला व बालकल्याण सभापतीपद कॉंग्रेसकडे, तर उपसभापतीपद शवसेनेकडे आहे.सध्या नगरपरिषदेत मनसे, अपक्ष, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या हातात सत्ता आहे. एका अर्थाने येथील नगरपरिषदेत सर्वपक्षीय सत्ता दिसून येत आहे. केवळ भाजापचा एक सदस्य असल्याने ते पदारूढ नाही. यावर्षी हिच परिस्थिती कायम राहणार, की त्यात बदल होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वांना सोबत घेऊनच शहराचा विकास करण्याचा मानस मनसेने व्यक्त केला होता. त्याला अनुसरून याहीवेळी नगरपरिषदेत सर्वपक्षीय नगरसेवक सभापती पदांवर आरूढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
सभापती पदांसाठी चुरस
By admin | Updated: December 18, 2014 23:03 IST