यवतमाळ : सुमारे पंधरा दिवसांपूर्वी येथील स्टेट बँक चौकात पार्सल दरोड्याची घटना घडली होती. गोपनीय माहितीवरून त्यांची ओळख पटली आहे. त्यामध्ये घटनेचा मास्टर मार्इंड अमरावतीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. शिवाय या घटनेत यवतमाळातील तीन ते चार सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्याचे पुढे आले आहे. मात्र पसार आरोपींना अटक करण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. धामणगाव येथून आंगडीया कुरीअर सर्व्हीसचे पार्सल घेवून येथे आलेल्या व्यावसायिकाला शस्त्राच्या धाकावर लुटण्यात आले होते. पार्सलमध्ये लाखोंच्या घरातील ऐवज (वर्थ कॅपीटल) होता, अशी कुजबूज येथील व्यावसायिक वर्तुळात आहे. मात्र या गंभीर घटनेची तीव्रता कमी करीत पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा चोरीत दडपला होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशीत करताच पोलीस खडबडून जागे झाले. दरोडेखोरांची गोपनीय माहिती मिळविणे सुरू झाले. विविध गुन्ह्यात यवतमाळ पोलिसांनी मोस्ट वॉटेंड असलेल्या एका गुन्हेगाराचे नाव पुढे आले. तसेच तोच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचेही निष्पन्न झाले. शिवाय त्याच्या टोळीतील तीन ते चार सदस्य यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळात सक्रीय असल्याचे सांगण्यात येते. आरोपींची ओळख पटूनही त्यांच्यापर्यंत अद्याप पोलीस पोहोचू शकलेले नाही. सूत्रधार असलेला आरोपी अमरावतीत दडून आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या यवतमाळातील एका दरोड्याच्या घटनेत त्याचा सहभाग होता. तेव्हापासूनपोलीस त्याच्या मागावर आहे. मात्र प्रत्येकवेळी तो पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसारच झाला आहे. तेव्हापासून तो पसारच आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पार्सल दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमरावतीत
By admin | Updated: November 16, 2014 22:54 IST