यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अनागोंदी कारभाराचे अनेक नमुने पुढे येत आहेत. कर्मचाऱ्यांचा गलथानपणा महामंडळाच्या आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे लेखा शाखेतील लेखापालावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. एसटी महामंडळाच्या तोट्यास वाहकच जबाबदार असल्याचा आरोप केला जातो. एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाईचाही बडगा उगारला जातो. परंतु प्रशासनात सुरू असलेला घोळ दुर्लक्षित असल्याचे अनेक बाबींवरून स्पष्ट होते. रजेच्या चुकीच्या नोंदी घेणे, रजापुस्तिका कित्येक महिने अडवून ठेवणे, सेवापुस्तिकेच्या तपासणीत दिरंगाई, अंकेक्षणात घोळ, रजा रोखीकरणात जादा दिवसांची रजा जमा करणे, रजा नोंदीच्या दुरुस्तीवर योग्य कारवाई न करणे, वैद्यकीय रजा मंजुरीत घोळ घालणे आदी प्रकार सुरू आहेत.एसटीच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करावी आणि यवतमाळ विभागात सुरू असलेली अनागोंदी थांबवावी, अशी मागणी यवतमाळ आगारातील वाहक प्रवीण मिश्रा यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये केली होती. लेखा शाखेतील लेखाकार अविनाश मुक्तेश्वर दाणी हे १९९९-२००६ या कालावधीत आस्थापना शाखेत लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांनी काही लोकांना नियमबाह्य आर्थिक लाभ करून दिल्याचा आरोप मिश्रा यांनी केला होता. स्वत:च्या युनियनच्या लोकांना चुकीच्या पध्दतीने लाभ देण्यात आल्याचा आरोप मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत केला होता. रजा शिल्लक नसतानाही सुट्या मंजूर करून एसटीचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला.या तक्रारीच्या आधारे झालेल्या चौकशीत अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. रजा नोंद पुस्तिकेत जादा रजेची नोंद केल्याने संबंधिताला आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला. यात महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. शिवाय वाहकाच्या निवडश्रेणीतही निष्काळजीपणा करण्यात आला. एसटीचे आर्थिक नुकसान झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. ही माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली आहे. यावर काय कारवाई होते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. आणखी काही कर्मचाऱ्यांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)
‘एसटी’तील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर
By admin | Updated: July 2, 2015 02:54 IST