दारव्हा नगरपरिषद : भाजपा समिती बाहेर, सपाला संधीदारव्हा : नगरपरिषद सभापती पदाच्या निवडणुकीत पाच पैकी चार पदे शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतली, तर एका पदावर समाजवादी पार्टीला संधी देण्यात आली. त्यामुळे या निवडीत सेनेचाच वरचष्मा राहिल्याचे बोलले जात आहे. बांधकाम सभापतीपदी प्रकाश दुधे, शिक्षण वैशाली सुभाष खाटिक, आरोग्य गजेंद्र चव्हाण, नियोजन समिती रवी तरटे याप्रमाणे विषय समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे सदस्य अविरोध निवडून आले. पाणीपुरवठा समिती सभापती पदावर समाजवादी पार्टीचे आरिफ काजी यांना शिवसेनेने संधी दिली. सोमवारी सकाळी ११ वाजता नगरपरिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेत विशेष सभा बोलाविण्यात आली. या सभेमध्ये उपाध्यक्षांकडे महिला बाल कल्याण समिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विषय समितीमध्ये पाच सदस्य संख्या निश्चित करण्यात आली. त्यानंतर सर्व गटनेत्यांनी आपल्या गटातील सदस्यांची नावे समित्यांकरिता सुचविला. त्यानुसार शिवसेना दोन, काँग्रेस व समाजवादी पार्टी प्रत्येकी एक याप्रमाणे नावे सुचविण्यात आली. परंतु भाजपाकडून कोणत्याही समितीमध्ये आपल्या गटातील नावे सुचविण्यात आली नाही. दुपारी झालेल्या सभेत सर्व सभापती पदांची निवड प्रक्रिया अविरोध पार पडली. सभापतीपदाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीला संधी देवून शिवसेनेने उपाध्यक्ष पदाच्यावेळी झालेली त्यांची नाराजी दूर केल्याची चर्चा आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी सपाला सत्तेत सोबत घेण्याचा सेनेचा निर्णय भाजपाच्या चांगला जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यामुळेच भाजपाने कोणत्याही समितीमध्ये आपल्या सदस्यांची नावे पाठविली नाही. (तालुका प्रतिनिधी)सपाला सोबत घेण्याची आवश्यकता नव्हती - बलखंडेनगरपालिकेमध्ये सेना-भाजपा युतीचे पूर्ण बहुमत असताना समाजवादी पार्टीला सोबतच घेण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. विचारधारा जुळत नसलेल्या पक्षाला पद देण्याचा निर्णय घेतल्याने भाजपा सदस्यांची नावे समितीमध्ये सुचविण्यात आली नसल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष धनंजय बलखंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मात्र याही स्थितीत सेना-भाजपा युती कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
सभापती निवडीत शिवसेनेचा वरचष्मा
By admin | Updated: January 17, 2017 01:24 IST