महिलांच्या आशा पल्लवित : सामान्य गणांकडेही महिलांच्या नजरा वणी : जिल्हा परिषद - पंचायत समिती गट व गणांची निवडणूक येत्या १६ फेब्रुवारीला होत आहे. जिल्हा परिषदेच्या चार गटांपैकी तीन गट मागासवर्गीयांसाठी राखीव झाल्याने अनेकांची मिनी मंत्रालयात जाण्याची स्वप्ने भंगली. त्यामुळे पंचायत समितीचा शिलेदार बनून मिनी मंत्रालयात पाय ठेवता येईल, असेही मनसुबे अनेकांनी रचले होते. मात्र गुरूवारी पंचायत समिती सभापतीचे निघालेले नामाप्र महिला आरक्षणसुद्धा अनेकांच्या तोंडचा घास पळविणारे ठरले. वणी पंचायत समितीच्या १७ व्या सभापतीची चाबी अधिकृतरित्या शिरपूर गणाकडे गेली आहे. मागील १५ वर्षांपासून तीन महिलांनी पंचायत समिती सभापतीचे पद भूषविले. यामाध्ये राजूर गणातील वसुंधरा गजभीये, कायर गणातील अल्का कोरवते व नांदेपेरा गणातून शालिनी सोमलकर या पदारूढ झाल्या होत्या. शिरपूर गणातून एकदाच अनिल राजूरकर यांच्या हाती चाबी गेली होती. १०-१२ वर्षानंतर पुन्हा शिरपूर गावाकडे ही संधी आली आहे. आठ गणांपैकी केवळ शिरपूर गणच नामाप्र महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे आता या गणातून निवडणूक लढविण्यासाठी महिलांची सर्वच पक्षाकडे मागणी वाढणार आहे. पक्षसुद्धा सभापतीची खुर्ची सांभाळू शकणाऱ्या सक्षम महिलेसाठी राखीव असल्याने या गणातून जर ओबीसी महिला निवडूनन आली, तर तिलासुद्धा सभापतीचा दावेदार बनता येणार आहे. तसेच शिंदोला, लाठी, घोन्सा, चिखलगाव या गणातून पुरूषांची मक्तेदारी मोडून महिलांनी निवडणूक लढविली व महिलेच्या गळ्यात विजयाची माळ पडली आणि ती महिला नामाप्र प्रवर्गाची असेल, तर त्यांनासुद्धा सभापतीच्या पदाचा लाभ घेता येतो. त्यामुळे ज्यांच्या आरक्षणामुळे आशा भंगल्या त्या महिला सामान्य गणात नशिब अजमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमा विजय पिदूरकर, संगीता अनिल राजूरकर, रूपलता संजय निखाडे, शालिनी अभय सोमलकर, उषा सुधाकर गोरे यांपैकी काही चेहरे समोर येण्याची शक्यता वाढली आहे. आठपैकी चार गण महिलांसाठी राखीव असले तरी चारपेक्षा अधिक महिला निवडून आल्या, तर तो महिलांच्या पुढारीपणाचा विजय ठरू शकतो. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तस-तसे राजकीय वातावरण गरम होत आहे. तिकीट मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात रस्सीखेच दिसून येत आहे. सारेच निष्ठावान गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे तिकीट वाटप करताना पक्षनेत्यांची चांगलीच कसरत होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) पाच महिला बनल्या उपसभापती वणी पंचायत समितीच्या उपसभापतीची धुरा आत्तापर्यंत पाच महिलांनी यशस्वीपणे पेलली आहे. त्यामध्ये शकुंतला गिरी (९२-९३), रेखा पानघाटे (९८-९९), विमल मडावी (२००५-०७), वृषाली खानझोडे (१२-१४) व रूपलता निखाडे (१४-१७) यांचा समावेश आहे. आता निवडणूक लढविण्यास रूपलता निखाडे यांना बढती घेण्याची संधी आहे. मात्र या निवडणूक लढविण्याच्या मुडमध्ये नसल्याचे समजते.
सभापतीची चाबी शिरपूर गणाकडे
By admin | Updated: January 21, 2017 01:33 IST