एसपींच्या सूचनेला संचालकांचा प्रतिसाद : ३२ लाखांचे बजेट, नागपूरच्या कंपनीला कंत्राट यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व ८२ शाखांमधील तिजोरीला आता सीसीटीव्ही कॅमेराचे सुरक्षा कवच पुरविले जाणार आहे. त्यासाठी बँक ३२ लाख रुपयांचा खर्च करणार असून बुधवारी नागपूरच्या एका कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील बँका चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत. प्रत्येकच महिन्यात कुठे तरी चोरीचा प्रयत्न होतो. दोनच दिवसापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुसद विभागीय शाखेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्यापूर्वी मालखेड, साखरा आदी शाखांमध्येसुद्धा चोरट्यांनी प्रयत्न केला. अशा चोऱ्या रोखण्यासाठी आणि झालेल्या चोऱ्यांमध्ये तपासाचा धागा मिळावा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे ठरत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नुकतेच जिल्हा बँक प्रशासनाला पत्र लिहून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत पुन्हा स्मरण करून दिले. अखेर त्यांच्या या पत्राला बँकेने प्रतिसाद दिला. सीसीटीव्ही कॅमेरासाठी निविदा काढली गेली. ३२ लाख रुपयांचे बजेट असलेला हा कंत्राट नागपूरच्या कंपनीला दिला गेला. आता जिल्हा बँकेच्या सर्व ८२ शाखांमध्ये सोनी कंपनीचे प्रत्येकी चार कॅमेरे बसविले जाणार आहे. प्रत्येक शाखेवर या माध्यमातून ४० हजार रुपयांचा खर्च होणार आहे. पोलिसांनी प्रत्येक शाखेला सुरक्षा रक्षक नेमण्याचीही सूचना केली आहे. परंतु अनेक ठिकाणी अद्याप सुरक्षा रक्षक नाही. दोन दिवसापूर्वी चोरीचा प्रयत्न झालेल्या पुसद येथील शाखेत सुरक्षा रक्षक तैनात होते, हे विशेष. बँकेने आपल्या शाखा स्वत:च्या इमारतीत उघडाव्या, तेथे स्ट्राँग रुम तयार करावी, अशाही सूचना जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्वच बँकांना केल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा बँकेला सीसीटीव्हीचे कवच
By admin | Updated: June 26, 2014 23:31 IST