यवतमाळ : प्रवासाहून परतलेल्या एका दाम्पत्याची येथील बसस्थानकात बॅग चोरीस गेली. त्यातील पर्स कर्तव्यावरील पोलिसाच्या हाती लागली. त्यानंतर त्याने संधी साधत एटीएम कार्डाचे पिनकोड मिळवित चक्क पैसे काढल्याची खळबळजनक घटना उजेडात आली. विशेष म्हणजे फौजदार असल्याची बतावणी करीत कार्ड बंद करण्यासाठी पिनकोड विचारला होता. खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रकरण ठाण्यात पोहोचले. मात्र थेट गुन्हा दाखल न करता प्रकरण चौकशीत ठेवत सारवासारव सुरू आहे.यवतमाळच्या गिरीजानगरातील एक दाम्पत्य रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास बसस्थानकात पोहोचले. घरी जाण्याच्या लगबगीत त्यांची बॅग लंपास झाली. या बॅगेतील पर्समध्ये २ हजार ५०० रूपये, दोन एटीएम कार्ड आणि महत्वाचे दस्तावेज होते. बॅग चोरीस गेल्याचे लक्षात येताच दाम्पत्याची भंबेरी उडाली. त्यांनी बसस्थानकातील प्रवाशांना विचारणा केली. तेव्हा बसस्थानकातील चौकीत कर्तव्यावर असलेला वडगाव रोड ठाण्यातील पोलीस शिपायी तेथे धडकला. त्याने दाम्पत्याकडून मोबाईल क्रमांक, राहण्याचे ठीकाण, चोरट्यांचे वर्णन अशी माहिती जाणून घेतली. दाम्पत्य निघून गेल्यानंतर चोरीतील पर्स त्या पोलीस शिपायाच्या हाती लागली. त्यानंतर त्याने संबंधीत दाम्पत्याला कॉल केला. फौजदार असल्याचे सांगत एटीएम कार्डचा पिनकोड जाणून घेतला. दरम्यान सोमवारी या दोन कार्डवरून तीन आणि पाच अशा आठ हजाराची उचल करण्यात आली. दाम्पत्याने बँकेशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मोबाईल क्रमांकाची खातरजमा केल्यानंतर तो पोलीसच असल्याचे निदर्शनास आले. अखेर त्यांनी याप्रकरणी वडगाव रोड पोलिसात तक्रार दिली. मात्र थेट गुन्हा दाखल न करता तक्रार चौकशीत ठेवण्यात आल्याचे खुद्द पोलिसातून सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी )
चोरीतील एटीएम कार्डावर काढली रोख
By admin | Updated: December 16, 2014 23:00 IST