कळसा-रोहणादेवी मार्ग : वन विभागाने सुरू केले उपचारदिग्रस : दिग्रस-दारव्हा रस्त्यावरील कळसा-रोहणादेवी वळण मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. काळवीटच्या पोटाला आणि पायाला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. ही माहिती मिळताच तपासणी नाका पथकाचे पोलीस रणजित गायकवाड, नगरपरिषद पथकाचे अश्विन इंगळे, शक्ती सोनवाल घटनास्थळी पोहोचले. त्याला पाणी पाजून उपचार मिळावा म्हणून उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांना माहिती दिली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काळवीट वनकर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. दिग्रस-दारव्हा मार्गालगत मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. सध्या शेतात कपाशी उभी असल्याने वन्यप्राणी शेतांकडे धाव घेत आहे. चाऱ्याच्या शोधात हरणांचे कळपही वनालगतच्या शेतात शिरत आहे. वन्यप्राण्यांचा हैदोस थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जागल करावी लागत आहे. दुसरीकडे वन विभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे. मात्र अनेकदा मुख्य मार्गालगत वन्यप्राण्यांचे बळी जात आहे. रात्री वाहने वन्यप्राण्यांची कोणतीही तमा न बाळगता सुसाट वेगाने धावत असल्याने त्यांचे बळी जात आहे. (प्रतिनिधी)
वाहनाच्या धडकेत काळवीट जखमी
By admin | Updated: November 13, 2016 00:23 IST