दोन बळी : बंदोबस्त केव्हा करणार ? डोंगरखर्डा : राळेगाव तालुक्यातील जंगलात एका नरभक्षक वाघाने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. दोन जणांचा बळी घेणाऱ्या या वाघाने मंगळवारी एका गोऱ्याला ठार मारले. यामुळे शेतकरी-शेतमजुरांनी शेतात जाणे बंद केले आहे. वन विभागाने या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. गत १५ दिवसांपासून खोरद, खैरगाव, झोटींगदरा परिसरात वाघाचे दर्शन गुराखी आणि शेतकऱ्यांना होत आहे. दोन दिवसापूर्वी खैरगाव कासार येथील मारोती विठ्ठल नागोसे आणि सोमवारी सखाराम टेकाम (झोटींगदरा) या दोन शेतकऱ्यांचा बळी वाघाने घेतला. तर मंगळवारी खोरद येथील विश्वेश्वर केशव ठाकरे यांच्या मालकीच्या गोऱ्हाला ठार मारले. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. तेव्हा गोऱ्हाचा केवळ सांगाडाच शिल्लक होता. गत काही दिवसांपासून वाघाचे दर्शन जंगलात गुराखी आणि शेतकऱ्यांना होत आहे. या वाघाने दोन माणसांना ठार मारल्यामुळे हा वाघ नरभक्षक झाला असून तो आणखी कुणावरही हल्ला करू शकतो. परिसरात या वाघाचीच चर्चा असून शेतकरी-शेतमजुरांनी शेतात जाणे अक्षरश: बंद केले आहे. त्यामुळे शेतातील कामेही ठप्प झाली आहे. या वाघाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. तूर्तास संपूर्ण परिसर वाघाच्या दहशतीत आहे. कुणीही शेतशिवारात जात नाही. (वार्ताहर)
नरभक्षक वाघाची नागरिकांत दहशत
By admin | Updated: September 7, 2016 01:28 IST