आरिफ अली बाभूळगाव कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्यातील बेंबळा नदीवर उभारलेल्या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अद्यापही अपूर्ण असून या प्रकल्पाचे हजारो लिटर पाणी पाटसऱ्यांअभावी वाहून जात आहे. बेंबळा कालव्याचे पाणी सैराट झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो. तसेच प्रकल्पग्रस्तांच्याही समस्या अद्यापही कायम आहे. ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला महत्त्वाकांक्षी बेंबळा प्रकल्प सध्या २१० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. परंतु या प्रकल्पामुळे बाधित झालेल्यांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाही. पुनर्वसित गावांमध्ये फेरफटका मारला तर समस्या दृष्टीस पडतात. कालवा निर्मितीकरिता केलेला २१० कोटी रुपयांचा खर्चसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे. अद्यापही कालव्यांचे काम पूर्ण झाले नाही. सद्यस्थितीत बेंबळा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून रबीकरिता सोडलेले पाणी सैराट झाले आहे. वाट मिळेल तिथे पाणी झिरपत असून पाटसऱ्या न बांधल्याने लाखो लिटर पाण्याचा पव्यय होत आहे. विदर्भातील प्रकल्प का रखडले, तळाशी असलेला गोंधळ शोधून काढण्यासाठी वेद, लोकनायक बापूजी अणे, भारतीय किसान संघ, स्मारक समिती व स्वदेशी जागरण मंच या पाच संघटना एकत्र आल्या. त्यांनी विदर्भ सिंचन शोधयात्रा सुरू केली. त्यात बेंबळा प्रकल्पावर संघटनेचे कार्यकर्ते २३ आॅगस्ट २०१५ रोजी आले होते. त्यावेळी खडक सावंगास्थित विश्रामगृहावर या शोधयात्रेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. या कालवा क्षेत्रातील ३० किमीपर्यंत कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. कालव्याचे काम अर्धवट दिसल्याने पदाधिकारी अधिकच संतापले. यानंतर कोपरा जानकर येथे आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या सभेत अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले. त्यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु २० महिन्यात कोणतीही कारवाई झाली नाही. अलिकडे आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्तांच्या काही समस्या सुटल्या. पंरतु अद्यापही अनेक समस्या कायम आहे. किमान १८ नागरी सुविधाही त्यांना अद्यापपर्यंत मिळाल्या नाही. त्यामुळे बेंबळा प्रकल्पग्रस्तांचे जगणे कठीण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी कळंब येथे येत आहे. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांसाठी काहीतरी घोषणाकरतील अशी अपेक्षा आहे.
कालवे अपूर्णच : प्रकल्पग्रस्तांच्या समस्याही कायम
By admin | Updated: December 29, 2016 00:26 IST