यवतमाळ : पैशाअभावी रखडलेला पणन महासंघाचा कापूस खरेदी प्रश्न शुक्रवारी निकाली निघाला असून कापूस खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने राज्यात शनिवारपासून कापूस खरेदीला प्रारंभ होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात चार केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ होणार आहे. दरवर्षी दसरा, दिवाळीदरम्यान पणन महासंघाच्या कापूस खरेदीला प्रारंभ होतो. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीचा प्रश्न रेंगाळला. याचा फायदा गावपातळीवर खेडा खरेदी करून व्यापाऱ्यांनी घेतला. शेतकऱ्यांची लूट करण्यात आली. हमी दरापेक्षाही कापसाची कमी किंमतीत खरेदी होऊ लागली. दरम्यान पणन महासंघाजवळ खरेदीसाठी पैसे नसल्याचा मुद्दा ऐरवणीवर आला. त्यामुळे कापूस खरेदीचा प्रश्न रेंगाळला. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने १५ नोव्हेंबरला कापूस खरेदीची घोषणा केली होती. आता नवीन सरकारने विश्वासमत जिंकल्यानंतर राज्य शासनाने पणन महासंघाच्या स्थितीचा आढावा घेतला. कापूस खरेदीसाठी लागणारा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. महासंघाला ३० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून शनिवार १५ नोव्हेंबरपासून राज्यातील २७ केंद्रावर कापूस खरेदीला प्रारंभ केला जाणार आहे. शुभारंभाच्या कापसाला रोखीने पैसे देण्यात येणार आहे. यानंतर खरेदी केंद्रावर येणाऱ्या कापसाला तीन ते चार दिवसात पैसे दिले जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, आर्णी, पुसद आणि मारेगाव येथे कापूस खरेदीला प्रारंभ होणार आहे. (शहर वार्ताहर)
यवतमाळातील चार केंद्रावर शनिवारपासून कापूस खरेदी
By admin | Updated: November 15, 2014 02:06 IST