लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करताना जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या वणी, पुसद व उमरखेड या दुर्गम भागात कोरोना रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन व इतर कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य तातडीने उपलब्ध व्हावेत याकरिता आवश्यक नियोजन करावे व बफर स्टॉक तयार ठेवावे, असे निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिले.जिल्हा प्रशासनाद्वारे कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात आढावा घेतला. तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने त्यादृष्टीने काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तसेच ऑक्सिजन गळतीसाठी काय उपाययोजना केल्या, क्लिनिकल आणि टेक्निकल ऑक्सिजन ऑडीट करण्यात आले आहे का, म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या, गरोदर महिला व नवजात बालकांमध्ये कोविडची काय परिस्थिती आहे, तांत्रिक साहित्य व मनुष्यबळाची आवश्यकता याबाबतही विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला.जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या तीनपट जास्त ऑक्सिजन क्षमता वृद्धींगत करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र त्यापेक्षाही जास्त ऑक्सिजन सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबत सिंह यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी पी. एस. चव्हाण, जिल्हा लसीकरण अधिकारी सुहास कोरे, डॉ. रमा बाजोरिया उपस्थित होते. बैठकीनंतर विभागीय आयुक्तांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच महिला रुग्णालयातील लिक्वीड ऑक्सिजन प्लँट, कोरोना वार्ड व लहान मुलांकरिता तयार करण्यात येत असलेल्या कोरोना वार्डाची पाहणी केली.
ॲटी बॉडीज तयार झाल्या का... अभ्यास करा- कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी ॲटी बॉडीज तयार झाल्या किंवा नाहीत, याचा अभ्यास करण्यासाठी सिरो सर्वे करावा, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले. तसेच ऑक्सिजन सिलिंडरमधील जवळपास १५ टक्के ऑक्सिजनचा वापर विहित प्रेशरअभावी होऊ शकत नाही. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी १५ टक्के जास्त ठेवण्याच्या सूचनादेखील त्यांनी केल्या.
ऑक्सिजन प्लान्टला गती, २९० सिलिंडरचा बफर स्टॉक
- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोविड उपायोजनांची माहिती बैठकीत दिली. जिल्ह्यात सध्या ६३.९३ मे.टन ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तर ६८.२१ मे.टन ऑक्सिजन साठ्याची प्रस्तावीत कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात एकूण १३२.१४ मे.टन ऑक्सिजन क्षमतेचा साठा तयार होणार आहे. वणी, पांढरकवडा, उमरखेड व पूसद येथे पीएसए प्लँट उभारण्या्त येत असून ते लवकरच कार्यन्वित होतील. यवतमाळ जिल्हा स्तरावर २९० सिलिंडरचा बफर स्टॉक ठेवण्यात आला आहे. तसेच नव्याने उपलब्ध होणाऱ्या सिलिंडरमधून वणी, उमरखेड व यवतमाळ येथे प्रत्येकी ७५ जम्बो सिलिंडर बफर स्टॉकमध्ये ठेवण्यात येतील. वणी येथून मारेगाव, पांढरकवडा, झरीजामणी या तालुक्यांसाठी तसेच उमरखेड येथून महागाव, पुसद, दिग्रस तालुक्यांसाठी तर यवतमाळ येथून बाभूळगाव, आर्णी, दारव्हा, नेर, कळंब, राळेगाव येथे गरजेनुसार बफर स्टॉकचे वाटप करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. लहान मुलांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ६० बेड्स, स्त्री रुग्णालयात ४० तसेच पुसद, पांढरकवडा व दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी २० बेड्स तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.