पूर्वतयारी : ३२४ शाळांतील ५० हजार विद्यार्थ्यांना लाभ पुसद : पूर्वी शाळेच्या पहिल्या दिवशी रिकाम्या हाताने जाणारे विद्यार्थी शाळा सुरू झाल्यानंतर पुस्तके खरेदी करत होते. परंतु सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात नवेकोरे पुस्तक संच दिले जाणार आहे. विद्यार्थी शाळेत पोहोचण्याच्या आधीच पुस्तके शाळेत पोहोचली आहेत. तालुक्यातील ३२४ शाळांतील ५० हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणारे ५० हजार ७५७ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. पहिली ते पाचवीच्या मराठी माध्यमाच्या २६ हजार ६७३ विद्यार्थी, सेमीइंग्रजी माध्यमाचे दोन हजार ४८६ विद्यार्थ्यांची पुस्तके शाळेत पोहोचली आहेत. तालुक्यात पाचवीपर्यंत इंग्रजी माध्यमाचे ३३१, हिंदी माध्यमाचे १८६ तर उर्दू माध्यमाचे तीन हजार ८१६ विद्यार्थी आहेत. सहावी ते आठवीचे १९ हजार ७६९ विद्यार्थी असून, त्यात १७ हजार ३५४ मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत. पाठ्यपुस्तके मोफत मिळत असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे. सध्या सुटीचा कालावधी सुरू असला तरी पहिल्या दिवशी विद्यार्थ्याच्या हाती पुस्तक देण्यासाठी केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक पुस्तकांचे संच घेऊन शाळेवर जात असल्याचे दिसून येत आहे. अंध, अपंग विद्यार्थ्यांसाठी बे्रनलिपीतील पुस्तकांची मागणी केली जात होती. त्यानुसार पुस्तके उपलब्ध झाली आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २१२ शाळा, नगरपरिषदेच्या २४ आणि खासगी अनुदानित ७९ शाळातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहे. गटशिक्षणाधिकारी ज्योती पांडे यांच्या मार्गदर्शनात पुस्तकांचे वितरण शाळानिहाय होत आहे. (सांस्कृतिक प्रतिनिधी)प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी नियमित वर्ग सुरू होणे अपेक्षित आहे. - प्रकाश घोडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी, पुसद
विद्यार्थ्यांच्या आधी शाळेत पोहोचली पुस्तके
By admin | Updated: June 24, 2015 00:16 IST