ओळख पटविण्याचे आव्हान : पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न पुसद : तरुणाचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुसद तालुक्यातील निंबी शिवारात शुक्रवारी उघडकीस आली. सदर तरुणाची ओळख पटली नसून त्याचा प्रथम गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. पुसद-वाशिम मार्गावरील तुळजा भवानी घाटात रस्त्याच्या बाजूला एका अज्ञात तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आढळून आला. या घटनेची माहिती वसंतनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सदर तरुण २५ ते ३० वर्षाचा असून त्याच्या अंगावर लालरंगाचा फुल टी-शर्ट व निळसर रंगाची जीन्स पँट घातलेली आहे. अज्ञात व्यक्तीने त्याचा गळा आवळून केला व त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना परिसरात माहीत होताच बघ्यांची एकच गर्दी जमली. निंबी येथील पोलीस पाटील रामराव काळे यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वसंतनगर पोलीस या तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असून मारेकऱ्यांचाही शोध घेत आहे. या खुनाचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. (प्रतिनिधी) कुटुंबीयांबद्दल अपशब्द वापरल्याने मित्राचा मोख येथे सुऱ्याने गळा चिरुन खून दिग्रस : दारूच्या नशेत कुटुंबीयांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या एका तरुणाची मित्रानेच सुऱ्याने गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची घटना दिग्रस तालुक्यातील मोख येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. समाधान श्रीराम भगत (३०) रा. मोख असे मृताचे नाव आहे. तर कैलास विश्राम भगत (३०) रा. मोख असे आरोपीचे नाव आहे. समाधान हा गवंडी काम करीत होता. गुरुवारी रात्री समाधानला मित्र कैलासने जेवणाच्या ताटावरून उठवून दारू पिण्यासाठी नेले. दरम्यान या दोघांमध्ये शिवीगाळ सुरू होती. शुक्रवारी सकाळी समाधानचा मृतदेह गावात आढळून आला. त्याचा गळा चिरलेला आणि शरीरावरही अनेक ठिकाणी वार आढळून आले. या घटनेची माहिती दिग्रस पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्याच वेळी संशयित कैलास भगत याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. दारूच्या नशेत समाधान हा शिवीगाळ करून कुटुंबाबद्दल अपशब्द बोलत होता. त्याचा राग धरुन आपण हे कृत्य केल्याची कबुली कैलासने पोलिसांपुढे दिल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, पोलीस निरीक्षक शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश चव्हाण, बाबाराव पवार, देविदास आठवले, नारायण पवार, विवेक सूर्यवंशी, नीळकंठ चव्हाण करीत आहेत. मित्राची हत्या केल्याचे उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
तरुणाचा खून करून प्रेत जाळले
By admin | Updated: January 7, 2017 00:13 IST