चौकशीची मागणी : तेलंगणात मृत्यूची घटना पांढरकवडा : भावासोबत रोजगारासाठी तेलंगणात गेलेल्या मुलाचा मृतदेहच परत आला. यावेळी दु:ख आवेग आवरून मुलाच्या मृत्युची चौकशी व्हावी, यासाठी वडील मृतदेहच घेवून पांढरकवडा पोलीस ठाण्यात धडकले. यावेळी ठाण्यात चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात घटनेची नोंद घेवून उत्तरीय तपासणी केली.शेख शाहरूख शेख कादर (२०) रा. गोंडवाकडी असे मृताचे नाव आहे. वडील शेख कादर शेख भानू यांनी त्याला लेबर कान्ट्रॅक्टर गुरान खान रा. गोंडवाकडी या आपल्या जावयासोबत चार महिन्यांपूर्वी रोजगारासाठी पाठविले. तेव्हापासून शाहरूख हा गुंटूर जिल्ह्यातील पालम येथील करूणा जिनींग अॅन्ड प्रेसींगमध्ये कामाला होता. अचानक सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गुरान खान शाहरूखचा मृतदेह घेवूनच गावात पोहोचले. शाहरूखचा अचानक मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबियांनी मुलगा गेल्याच्या दु:खावेगातच कशीबशी रात्र काढली. त्यानंतर मंगळवारी सकाळी वडील शेख कादर आणि गावकरी मृतदेह अॅम्बुलन्समध्ये ठेऊन पांढरकवडा ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी संतप्त जमावाची समजूत काढत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर शाहरूखच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. तसेच मृत्युचे कारण आणि घटनास्थळ स्पष्ट झाले नसल्याने अकस्मात घटनेची नोंद घेतली. (शहर प्रतिनिधी )
मुलाचा मृतदेह घेऊन वडील ठाण्यात
By admin | Updated: December 16, 2014 23:00 IST