यवतमाळ : गुटख्याच्या उधारीच्या पैशावरून झालेल्या वादात पानठेला चालकासह चौघांनी चाकूने भोसकून एका तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना येथील धामणगाव मार्गावरील पॉलिटेक्नीक कॉलेजजवळ सोमवारी रात्री घडली. या घटनेतील चारही आरोपी पसार झाले आहे. नितेश सुभाष मंदेवार (३०) रा. पिंपळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. तो येथील तलाव फैलातील पॉवर हाऊसजवळ असलेल्या संतोष वडदकर (३५) याच्या पानठेल्यावर खर्रा खाण्यासाठी नियमित जात होता. यातूनच नितेशवर गुटख्याची उधारी झाली. सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे नितेश पानठेल्यावर गुटखा खाण्यासाठी गेला. त्यावेळी पानठेला चालकाने उधारीच्या पैशाची मागणी केली. त्यावरून या दोघात चांगलाच वाद झाला. वादात नितेशने पानठेला चालकाच्या कानाखाली हाणली. मात्र त्यानंतर प्रकरण शांत झाले.दरम्यान, संतोषने आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा निश्चय केला. त्याने आपले तीन मित्र सलमान (३०), पन्नालाल जयस्वाल (४०) रा. मंगेशनगर, यवतमाळ, सुरेंद्र गुगरे (२७) रा. वर्धा यांना हा प्रकार सांगितला. या चौघांनी नितेशला मोबाईल करून दुपारची भानगड विसरुन आपण ढाब्यावर जेवायला जाऊ असे सांगितले. यावरून नितेश या तिघांसोबत धामणगाव मार्गाने सोमवारी रात्री जात होते. त्यावेळी पॉलिटेक्नीक कॉलेजजवळ काही कळायच्या आत या चौघांनी नितेशला मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर चाकूने वार केले. यात नितेशच्या पोटात खोल जखम झाल्याने रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार समाधान काळे रा. तलावफैल यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चौघेही आरोपी पसार असल्याची माहिती आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
गुटख्याच्या उधारीतून तरुणाचा निर्घृण खून
By admin | Updated: April 8, 2015 02:10 IST