इवळेश्वरची घटना : दोरीने गळा आवळला, खरचटल्याचे व्रणआर्णी : विवाहित महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना तालुक्यातील इवळेश्वर येथील जंगलात शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृताच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण असून खरचटल्याच्या खुना आहे. त्यामुळे दोरीने गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. उबेदखॉ अमानउल्लाखॉ (२२) रा.घोन्सरा असे मृताचे नाव आहे. इवळेश्वर येथील नारायण कुडमेथे हे कामानिमित्त जंगलाकडे गेले असता त्यांना उबेदखॉ हा मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी घटनेची माहिती मृताचा भाऊ फैयाज खान आणि पोलिसांना दूरध्वनीवरून दिली. घटनेची माहिती मिळताच उबेदखॉ याचे नातेवाईक आणि पोलीस तेथे दाखल झाले. यावेळी पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला. गळ्याला दोरीने आवळल्याचे व्रण आणि हातापायाला खरचटल्याच्या जखमा असल्याने त्याचा खूनच झाला असावा असा संशय व्यक्त करीत उबेदखॉचे वडील अमानउल्लाखॉ अमीरखॉ यांनी आर्णी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये इवळेश्वर येथील एका विवाहित आणि दोन अपत्य असलेल्या महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते. तो नेहमीच तिच्याकडे जायचा. त्यांच्या या संबंधाला तिचे नातेवाईक आणि समाजातील व्यक्तींचा विरोध होता. अनेकदा त्यांनी उबेदखॉ याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्यातूनच संशयित उज्ज्वला मडावी, शारदा आडे, चंदू कुडमेथे, परमेश्वर कुडमेथे, शशिकांत कुडमेथे, लवकुश कुडमेथे, गजानन ठवकर सर्व रा.इवळेश्वर यांनीच त्याचा खून केला असावा असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्यावरून ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी संबंधित सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यातील उज्ज्वला हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित सहा जणांना लवकरच ताब्यात घेवू अशी माहिती पोलिसांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
अनैतिक संबंधातून तरुणाचा खून
By admin | Updated: January 31, 2015 23:27 IST