म्युझिकल शो : अनुराधा पौडवाल यांच्या गायनाने समता समुद्राला उधाणयवतमाळ : सुपरहिट सिनेगीते गाऊन घरा-घरात पोहोचलेल्या विख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा ‘म्युझिकल शो’ शनिवारी रात्री येथील समता मैदानात हाऊसफुल्ल झाला. गाजलेली चित्रपट गीते सादर करतानाच मराठी भावगीतांचाही मधुर नजराणा त्यांनी पेश केला. मात्र, समोर बसलेल्या श्रोत्यांना ‘समते’ची तान ऐकण्याची आतुरता होती. ‘एक डाव बाबासाहेबांचे गाणे’ अशा लेखी फर्माईशी आणि तोंडी आवाहन सुरू होते. शेवटी सर्वसामान्यांची साद सेलिब्रिटीने ऐकली अन् ‘शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे’ या गाण्याचा सराव आणि सादरीकरण दोन्ही एकाच वेळी अनुभवण्याची किमया घडली.समता पर्वाच्या निमित्ताने पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचा ‘म्युझिकल शो’ आयोजित करण्यात आला होता. श्रोत्यांच्या गर्दीने समता मैदान खचाखच भरले होते. आपल्या बैठकीप्रमाणे अनुराधा पौडवाल यांनी भावगीतांनी आरंभ केला. जिल्हा शेतकऱ्यांचा आहे म्हटल्यावर त्यांनी शेतीशी संबंधित ‘काया मातीत मातीत तिफन चालते’ सादर करून गर्दीच्या मनात घर केले. क्षणाचीही उसंत न घेता लगेच आशिकी सिनेमातील ‘धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना’ सुरू केले. पण श्रोत्यांना आस लागली होती भीमगीतांची. गाण्यादरम्यान आणि गाणे संपताच ते ‘तुम्हाला बाबासाहेबांची आण आहे, एक डाव बाबासाहेबांचं गाण म्हणाच’ असा आग्रह धरत होते. हा आग्रह लक्षात येताच अनुराधा पौडवाल म्हणाल्या, आपल्या समाजात हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. माझं बेस्ट मी तुम्हाला देणार आहे. तुमचं बेस्ट मला द्या. त्यावरच तुमचं-माझं नातं ठरणार आहे. आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘जिये तो जिये कैसे बिन आप के’ या सुपरहिट ‘साजन’च्या गीतालाही बहर आला. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो’ म्हणणाऱ्या अनुराधा पौडवाल यांना यवतमाळच्या श्रोत्यांनी दादच दिली. ‘क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहके’, ‘रूपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’, ‘प्रिये जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ अशा गाण्यांनी मैफलीत रंगत आणली. पण श्रोत्यांचे मन भीमगीतांसाठी ‘दिल है के मानता नही’च्या भूमिकेतच होते. अखेर अनुराधा पौडवाल यांच्या संचातील सहकारी गायक सरसावला.छाती ठोकून सांगू जगाला असा विद्वान होणार नाहीकोणी झालाच विद्वान मोठाबुद्ध भगवान होणार नाही!हे त्याचे गीत सुरू असताना समता मैदानातील ‘समतेचा समुद्र’ अक्षरश: उधाणला. आतापर्यंत न झालेली ‘वन्स मोअर’ची मागणी झाली. अनुराधा पौडवालही ‘काही चुका झाल्या तर ताई समजून सुधारून घ्या’ म्हणत ‘बहुत प्यार करते है तुम को सनम’ म्हणत रसिकांना रिझवित राहिल्या. शेवटी त्यांनीही कानात हेडफोन लावून एक भीमगीत ऐकले. स्टेजवरच त्याचा अभ्यास केला. अन् म्हणाल्या, आज पहिल्यांदाच मी एखादे गीत स्टेजवरच तयार करून गात आहे. सांभाळून घ्या...शिल्पकार जीवनाचाभीम माझा होता रेरंजल्या नि गांजल्यांचाभीम दाता होता रे...अनुराधा पौडवाल यांनी हे गाण सुरू करताच गर्दीच्या आनंदाला पारावार उरला नाही. अविरत टाळ्या मिळत राहिल्या. ‘जय ज्योती जय भीम’चा घोष सुरू झाला. शेवटी अनुराधांच्या संगतीने प्रेक्षकही गाऊ लागले. गायक कितीही पट्टीचा असो, आवाज मात्र श्रोत्यांचाच बुलंद असतो, असा प्रत्यय आला.मैफलीपूर्वी समता पर्व महिला बचत गटाच्या महिलांनी अनुराधा पौडवाल यांचा सत्कार केला. यावेळी समता पर्वाचे मुख्य समन्वयक अंकुश वाकडे, अध्यक्ष किशोर भगत कार्याध्यक्ष अनिल आडे, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्रकाश भस्मे, सचिव अॅड. रामदास राऊत, मन्सूर एजाज जोश, सिद्धार्थ भवरे, हरिदास मेश्राम, रुचिका पिसे, राजूदास जाधव, नामदेव थूल, प्रमोदिनी रामटेके, प्रल्हाद सिडाम, राखी भगत, स्मिता उके, जयश्री भगत, अर्चना खरतडे, लोपामुद्रा पाटील, रिना पानतावणे, भावना भगत, प्रिया वाकडे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
आतूर कान, मधुर तान...अन् बाबासाहेबांची आण!
By admin | Updated: April 10, 2017 01:49 IST