काँग्रेसचा आरोप : गावागावांत जनजागृती अभियानयवतमाळ : केंद्र व राज्यातील शासन सध्या त्यांनीच दिलेल्या प्रत्येक आश्वासनाच्या बाबतीत ‘यू टर्न’घेत आहे. ‘तो मी नव्हेच’अशी भूमिका शासनाने घेतल्याचे त्यांच्याच बोलण्यातून दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी बुधवारी येथील आझाद मैदान स्थिती महात्मा गांधी पुतळ्याजवळ आयोजित पत्रपरिषदेत केला. ‘केंद्र व राज्याच्या कारभाराचे पर्दाफाश’ जिल्हास्तरीय आंदोलन काँग्रेसकडून काळ्या फिती लावून येथील आझाद मैदानातील गांधीभवनात करण्यात आले. आंदोलनानंतर पत्रपरिषदेत शिवाजीराव मोघे बोलत होते. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजना कशा फसव्या आहेत याचीही माहिती दिली. शासनाने कोणतीही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. केवळ भ्रष्टाचारात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी काही करण्याची शासनाची इच्छा नाही. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काँग्रेसने त्यांचा हा डाव उधळून लावल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. त्यामुळे कृषीक्रांती ही नावालाच असल्याचे ते म्हणाले. शासन म्हणजे सातबारा कोरा करू पण कर्जमाफी नाही. कर्जमाफी शिवाय सातबारा कोरा कसा होणार, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. काँग्रेसने तिजोरी खाली करून ठेवली, असा भाजपाचा आरोप आहे, याबाबत बोलताना ते म्हणाले, सर्वाधिक कर्ज यापूर्वी भाजपा-सेनेच्या काळातच राज्यावर झाले आहे. त्यामुळे आमच्यावरील हा आरोप निराधार आहे. अशाप्रकारे आंदोलने हे यापुढेही सुरूच राहणार असून गावागावात जाऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी आमदार विजय खडसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विजयाताई धोटे, आर्णीचे नगराध्यक्ष आरिज बेग, तातू देशमुख, अरुण राऊत, देवानंद पवार, आनंद गायकवाड आदींचीही उपस्थिती होती. (प्रतिनिधी)कांद्याचे हार अन् हाताला काळया फितीबुधवारी करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग नोंदविला. अनेक कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घुमजाव करणाऱ्या विधानावर यावेळी तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला. पंतप्रधानांच्या वक्तव्याची पोलखोल करणारी कॅसेट यावेळी लावण्यात आली होती. त्यांच्या विधानाची वचनपूर्ती होणार कधी, असा प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
‘अच्छे दिन’पासून भाजपाचा यू टर्न
By admin | Updated: August 27, 2015 00:11 IST