सुरेंद्र राऊत यवतमाळ भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराने नवख्या आमदारांना डावलत स्वत:च्याच तुंबड्या भरण्याचा प्रयत्न चालविल्याची तक्रार जिल्ह्यातील भाजपाच्या चार आमदारांनी खुद्द मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यामुळे केवळ एकाच मतदारसंघाचा विकास होत असून इतर भाग विकासापासून दूर जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाबाबत ही तक्रार असल्याने या सर्वच कामाला आता स्थगिती मिळाली आहे. आता पुन्हा विकास कामे वाटपाची प्रक्रिया केली जाणार आहे. ही कामे रेंगाळल्याने त्याचा फटका जिल्ह्याच्या विकासाला बसत आहे. जिल्ह्यातील भाजपाच्या चार आमदारांना प्रथमच विधानसभेत संधी मिळाली आहे. प्रशासकीय अनुभव असलेल्या भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराला जिल्ह्यातील भाजपाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. या सर्व नवख्या आमदारांना प्रशासकीय बाबीचे मार्गदर्शन करून पक्षाला अधिकाधिक बळकटी देण्याची जबाबदारी याच ज्येष्ठ आमदारावर आली होती. मात्र दुर्दैवाने ही संधी त्या आमदाराने गमावली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत लघु गटाच्या अध्यक्षपदाचा फायदा घेऊन या आमदारांनी प्रतिस्पर्धी पक्षातील ज्येष्ठ आमदारासोबत काम वाटपाच्या वाटाघाटी केल्या. नवीन आलेल्या आमदारांना पाने पुसण्याचे काम जिल्हा नियोजन समितीकडून करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या नवख्या आमदारांनी एकत्र येऊन केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपल्या श्रेष्ठींकडे तक्रार केली. भाजपाचा जिल्हा पातळीवर नेतृत्व करणारा चेहरा अजूनपर्यंत समोर आलेला नाही. विधानसभा निवडणुकीतील बदललेल्या समीकरणाने जिल्हा मुख्यालयाच्या ज्येष्ठ भाजपा आमदाराला ही सुवर्ण संधी मिळाली होती. मात्र त्या पद्धतीने अधिनस्त आमदारांच्या अडीअडचणी जाणून घेण्याऐवजी त्यांची गच्छंती करण्याचाच प्रयत्न झाला. याचा परिणाम थेट जिल्ह्याच्या विकास कामांवर होत आहे. भाजपातील अंतर्गत दुफळी आता सर्वश्रृत झाली असून प्रशासकीय यंत्रणेमध्येसुद्धा ते स्पष्ट दिसत आहे. जिल्हा नियोजन समितीने मार्च महिन्यात ३० कोटी १४ लाखांची कामे मंजूर केली होती. यातील बहुतांश कामे यवतमाळ आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघातच टाकण्यात आली. उर्वरित आमदारांना केवळ काही लाखांचा निधी देऊन शांत बसविण्यात आले. यामुळे सत्ताधारी आमदारांनीच आपल्या पक्षश्रेष्ठींकडे पुन्हा कामे वाटपाची मागणी केली. त्यामुळे आता मार्चमध्ये मंजूर झालेल्या सर्वच कामांना स्थगिती मिळाली आहे. ही कामे वाटप करताना मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी करण्यात आली. या सर्व कामांना आता स्थगिती मिळाली आहे. हीच कामे समसमान पद्धतीने मार्च महिन्यात वाटप करण्यात आली असती तर आज संपूर्ण कामे सुरू झाली असती. ज्येष्ठ आमदाराच्या हव्यासापोटी ही कामे रखडली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आणि यावर्षीची दुष्काळी परिस्थिती अशा स्थितीत जलसंवर्धनाची कामे अत्यावश्यक होती. त्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील गावात मुक्काम केला. त्याउपरही सत्ताधारी आमदारात एकवाक्यता नसल्याचे दिसून येते.
भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा हव्यास विकासाच्या मुळावर
By admin | Updated: April 24, 2015 01:15 IST