शिवसेना पराभूत : काँग्रेस तिसऱ्या स्थानी, बालेकिल्ला ढासळलावणी : वणी विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शिवसेनेचे उमेदवार विश्वास नांदेकर यांचा ५ हजार ६०६ मतांनी पराभव केला. शेवटपर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या मतमोजणीत अखेर भाजपाने बाजी मारली. विद्यमान आमदार काँग्रेसचे उमेदवार वामनराव कासावार तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. वणी विधानसभा मतदार संघात यावेळी भाजपाचे संजीवरेड्डी बोदकुवार, शिवसेनेचे विश्वास नांदेकर, काँग्रेसचे वामनराव कासावार, राष्ट्रवादीचे संजय देरकर आणि मनसेचे राजू उंबरकर यांच्यात पंचरंगी लढत झाली. त्यामुळे निकालाबाबत उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते व सामान्य मतदारांनाही उत्सुकता होती. पंचरंगी लढतीत कोण बाजी मारणार, हे शेवटपर्यंत गुलदस्त्यात होते. त्यामुळे प्रत्येक फेरीनंतर उमदेवारांची धाकधूक वाढत होती. प्रत्येक फेरीत उमेदवारांचे क्रमांक सतत बदलत असल्याने निकालाबाबात प्रचंड उत्सुकता होती. सुरूवातीच्या पाच फेऱ्यांमध्ये मनसेचे उमेदवार राजू उंबरकर सर्वात पुढे होते. भाजपाचे बोदकुवार त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर होते. काँग्रेसचे कासावार दुसऱ्या, शिवसेनेचे नांदेकर चौथ्या, तर राष्ट्रवादीचे संजय देरकर पाचव्या स्थानी होते. सहाव्या फेरीनंतरही उंबरकर प्रथम, कासावार व्दितीय, देरकर तृतीय, बोदकुरवार चतुर्थ, तर नांदेकर पाचव्या स्थानी होते. आठव्या फेरीपर्यंत हा क्रम सतत पुढे-मागे होत राहिला. त्यानंतर नवव्या फेरीत बोदकुरवार यांनी आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकाविला. या फेरीनंतर ते पहिल्या स्थानी, उंबरकर दुसऱ्या, देरकर तिसऱ्या, नांदेकर चौथ्या, तर कासावार पाचव्या स्थानी फेकले गेले. त्यानंतर बोदकुरवार यांनी प्रथम कमांक सोडलाच नाही. अकराव्या फेरीनंतर बोदकुरवार पहिल्या, तर उंबरकर दुसऱ्या स्थानी कायम होते. तेराव्या फेरीनंतर मात्र बोदकुरवार पहिल्या, तर नांदेकर दुसऱ्या, उंबरकर तिसऱ्या, देरकर चौथ्या, तर कासावार पाचव्या स्थानी गेले. नवव्या फेरीनंतर सतत बोदकुरवार पहिल्या क्रमांकावर होते. मात्र दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा क्रमांक सतत बदलत होता. कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेना आणि कधी शिवसेना, तर कधी काँग्रेस दुसऱ्या स्थानी येत होती. अखेर २२ व्या फेरीनंतर बोदकुरवार यांनी निर्णायक आघाडी घेतली. या फेरीनंतर शिवसेना दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या, तर मनसे पाचव्या स्थानावर गेली. शेवटच्या तेविसाव्या फेरीनंतर भाजपाचे बोदकुरवार यांनी शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांच्यावर पाच हजार ६0६ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. (कार्यालय प्रतिनिधी)
वणीत भाजपाचा विजय
By admin | Updated: October 19, 2014 23:19 IST