लक्षवेधी लावणार : ‘चेंज’साठी मोर्चेबांधणीयवतमाळ : जिल्ह्यातील भाजपाचे नवनियुक्त आमदार जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराज आहेत. ही नाराजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत.संजय दराडे यांना यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होवून अवघे काहीच महिने झाले आहेत. विधानसभेपूर्वी ते येथे रुजू झाल्याने त्यांना नागपूरच्या पालकमंत्र्यांनी खास बाब म्हणून यवतमाळला आणल्याची चर्चा त्यावेळी राजकीय गोटात होती. या चर्चेचे सावट अद्यापही कायम आहे. पोलीस प्रशासनाची काँग्रेससोबत अद्यापही जवळीक असून भाजपाशी सुरक्षित अंतर ठेवून पोलीस वागत असल्याचा भाजपच्या गोटातील सूर आहे. पोलीस प्रशासनावर ‘काँग्रेसच्या कार्यकाळातील’ असा ठपका ठेवला जात आहे. नवनियुक्त भाजप आमदारांमध्ये पोलीस प्रशासन आपल्याला तेवढी किंमत देत नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच जिल्हा पोलीस दलाच्या कारभारावर या आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. पोलिसांचा हा कारभार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात गाजविण्याची तयारी एकजुटीने करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना मांडल्या जाणार आहेत. त्यासाठी ‘कुंडली’ही तयार करण्यात आल्याची माहिती आहे. भाजप आमदारांना जिल्हा पोलीस प्रशासनात ‘चेंज’ हवा आहे. त्यासाठी थेट विदर्भातील अर्थमंत्री आणि गृह तथा मुख्यमंत्री यांना साकडे घातले गेले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनीही या ‘चेंज’साठी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याचे सांगितले जाते. हा चेंज होवू नये म्हणून ‘ताई’ प्रयत्नरत असल्या तरी त्यांनाही भाजप आमदारांनी आपल्या राजकीय अडचणी सांगून गप्प बसविल्याचे बोलले जाते. त्यामुळे पोलीस प्रशासनात ‘चेंज’ होणारच असा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. एवढेच नव्हे तर पोलीस प्रशासनाची धुरा कुणाकडे सोपवायची यासाठी सोयीचा चेहरा शोधला जात आहे. सत्ताधाऱ्यांचा मानसन्मान राखणारा, कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविणारा चेहरा भाजपला पोलीस प्रशासनाच्या खुर्चीत हवा आहे. हा चांगला चेहरा शोधण्यासाठी जिल्ह्यातील जुन्या जाणत्या, अनुभवी अधिकाऱ्यांना कामी लावण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
भाजपाचे आमदार पोलिसांवर नाराज
By admin | Updated: November 27, 2014 23:41 IST