पराभवाचीच मालिका : युती-आघाडी करूनही अपवादानेच यशरवींद्र चांदेकर यवतमाळ जिल्ह्यातील सहकार क्षेत्र ताब्यात घेण्याचा भाजपाचा मनसुबा उधळला जात आहे. सहकार क्षेत्रात भाजपाला भरीव यश संपादन करण्यात अनेक अडसर येत असून पक्षाने काही सहकारी संस्थांमध्ये मात्र चंचुप्रवेश केला आहे.गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाचे वारू चौखूर उधळले. मतदारांनी त्यांच्या पारड्यात मतांचे भरून दान टाकले. सार्वत्रिक निवडणुकीतील हे यश बघून पक्षाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्राकडे नजर वळविली. तथापि सहकार क्षेत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घट्ट पाय रोवले आहे. अनेक सहकारी संस्था या दोन पक्षांच्या समर्थकांच्या ताब्यात आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, सहकारी सोसायट्यांवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विचारांचा पगडा असलेल्यांचा वरचष्मा आहे. सहकार क्षेत्रात चंचुप्रवेश करण्यासाठी भाजपाने जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समिती, खरेदी विक्री संघ आणि सोसायटींच्या निवडणुकीत उडी घेतली. मात्र अपवाद वगळता या पक्षाला यश प्राप्त करणे कठीण गेले. कुठे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मदतीने भाजपाने सहकार क्षेत्रात चंचुप्रवेश करण्याचा बेत आखला होता. मात्र मतदारांनी त्यांचे मनसुबे हाणून पाडले. परिणामी भाजपाला कुठेच एकहाती सत्ता प्राप्त होऊ शकली नाही. इतरांच्या कुबड्या घेऊनच त्यांना काही सहकारी संस्थांमध्ये थोडे यश मिळविता आले. यवतमाळ बाजार समितीवर आत्तापर्यंत भाजपाच्या सूर्यकांत गाडे यांची सत्ता होती. तीसुद्धा आता हातून गेली आहे. वणी परिसरात इंदिरा सहकारी सूतगिरणी, खरेदी विक्री संघ, वसंत जिनिंग आदी निवडणुकीत भाजपाला झटका बसला. केवळ वणी बाजार समितीत निसटत्या बहुमताच्या जोरावर सत्ता प्राप्त करण्यात पक्षाला यश मिळाले. आर्णी तालुक्यातही इतर पक्षांच्या साथीने बाजार समितीत चंचुप्रवेश मिळविला. अपवाद वगळता पक्षाला पाय रोवता आले नाही.
सहकारात भाजपाचा ‘चंचूप्रवेश’
By admin | Updated: October 14, 2016 03:02 IST