महागाव(कसबा) : विविध प्रकारच्या कामांची बिले बोगस पावत्यांच्या आधारे काढली जात आहे. या प्रकारात शासनाचा महसूल बुडण्यासोबतच मजूर वर्गाचीही पिळवणूक होत आहे. या कुणावरही कारवाई होत नसल्याने या प्रकाराला अधिकाऱ्यांची मूक संमती तर नसावी, अशी साधार शंका व्यक्त केली जात आहे. महागाव, पाभळ, वागद, वडगाव गाढवे यासह इतर ठिकाणी विविध प्रकारची बांधकामे झाली आहेत. यासाठी गिट्टी, रेती, सिमेंट, गज आदी प्रकारच्या साहित्याचा वापर झाल्याने अधिकृत पुरवठादारांची बिले सादर करावी लागतात. मात्र या भागात अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तीच्या नावे बिले सादर होतात. शिवाय गिट्टी, गिट्टा, डबर, मुरूम, रेती यासाठीची बिलेही अनधिकृत पुरवठादारांच्या नावाने सादर होत असल्याच्या बाबी पुढे येत आहे. गेली अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रकार शासनाचा महसूल बुडण्यास कारणीभूत ठरत आहे. लाखो रुपयांची बिले अनधिकृत पावत्यांच्या आधारे कशी काढली जातात याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
बोगस पावत्यांच्या आधारे काढली जात आहेत बिले
By admin | Updated: January 16, 2017 01:14 IST