सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात दुर्धर आजारांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी अत्याधुनिक उपचार सुविधा असणारे सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल मंजूर झाले. यावर १५५ कोटी रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली. अत्याधुनिक यंत्र खरेदी झाली आहे. यापैकी २७७ यंत्र रुग्णालयात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून ही यंत्रसामग्री धूळ खात पडली आहे. वापराविनाच ही यंत्र निकामी होण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोना काळात सुपर स्पेशालिटीची इमारत कोविड वार्ड म्हणून वापरात होती. आता कोरोना रुग्ण नसल्याने ही इमारत रिकामी करण्यात आली आहे. या सुसज्ज इमारतीचा रुग्णालय म्हणून वापर कधी होईल याची प्रतीक्षा आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुर्धर आजाराचे निदान होण्यासाठी अत्याधुनिक अशा महागड्या मशिनरी खरेदी केल्या आहेत. यामध्ये सीटी स्कॅन, संगणकीकृत रेडियालॉजी युनिट, स्तनाच्या कर्करोगाचे निदान करणारे डिजिटल मेमोग्राफी सिस्टीम, हृदयरोगाचे निदान करणारे फोर-डी कलर ड्राॅपलर इको कार्डिओग्राफी यंत्र, पोर्टबल इको कार्डिओग्राफी, मेंदूवर शस्त्रक्रियेसाठी लागणारे न्युरोसर्जिकल ऑपरेटिंग मायक्रोस्कोप, मल्टिपॅरामीटर मॉनिटर १६, फायबर ऑप्टिक ब्रोन्कोस्कोप, ॲनेस्थेशिया वर्क स्टेशन विथ मॉनिटर यासह अनेक महत्त्वाची यंत्र आली आहे. ती ठेवण्यासाठी रुग्णालय परिसरात जागा नाही. बेवारस अवस्थेत कोट्यवधीची यंत्रे पडून आहेत. ती सुरू होतील की नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. या रुग्णालयासाठी राज्य शासनाने डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी यांची पदे मंजूर केली आहे. मात्र, यापैकी केवळ दोन नर्सेस, एक डॉक्टर व तीन लिपिक इतकेच मनुष्यबळ मिळाले आहे. यांच्या भरवशावर रुग्णालय सुरू होणे शक्य नाही. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम केले. त्याचे हस्तांतरण राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे झालेले नाही. त्यामुळे पुढची सर्व प्रक्रिया रखडली आहे.
रुग्णांची उपचारासाठी परवड- अतिविशेष उपचार रुग्णालयात मेंदूवरील शस्त्रक्रिया, कॅन्सरसारख्या आजाराचे निदान व उपचार, स्पाईनवरील शस्त्रक्रिया, लहान मुलांवरील दुर्धर शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी लागणारी ही सर्व यंत्रसामग्री आहे. आज ही उपचार प्रणाली उपलब्ध नसल्याने गरीब रुग्णांना महानगरांकडे धाव घ्यावी लागत आहे. अनेकांची आर्थिक स्थिती नसल्याने गरीब रुग्ण उपचार घेऊ शकत नाही. आजार अंगावर काढतच मृत्यूला कवटाळतात. असे असले तरी सुसज्ज झालेली सुपर स्पेशालिटी इमारत व यंत्र सामग्री वापरात येत नाही.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीचे हस्तांतरण झालेले नाही. या रुग्णालयासाठी यंत्रसामग्री पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ही यंत्रे अधिकृतरीत्या स्वीकारलेली नाही. त्या कंपन्या स्वत:च्या जबाबदारीवरच विविध यंत्र आणून ठेवत आहे. सध्या ती रुग्णालय प्रशासनाने ताब्यात घेतली नाही. घेताना ती सुरू अवस्थेतच आहे की नाही याची खात्री केली जाईल. तूर्त पदभरती व इमारत हस्तांतरणासाठी पाठपुरावा सुरू आहे. - डॉ. मिलिंद फुलपाटील अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.