ठेवी कोट्यवधींच्या : १० दिवसांपासून शाखेला टाळे यवतमाळ : अधिक व्याजदराचे आमिष देत तीन महिन्यात ग्राहकांकडून लाखो रूपये गोळा करण्यात आले. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता कार्यालयाला टाळे लागले. त्यामुळे लाखो रूपये बुडाल्याचा धसका शेकडो खातेदारांनी घेतला आहे. तर खातेदार अंगावर येत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सुरक्षा मागितली. हा प्रकार येथील मुख्य बाजारपेठेतील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) कॅश क्रेडिट सोसायटीच्या उघडकीस आला. तीन महिन्यांपूर्वी येथील मुख्य बाजारपेठेतील फुटाणा गल्लीत भाईचंद हिराचंद रायसोनी कॅश क्रेडिट सोसायटीची शाखा स्थापन करण्यात आली. सुरक्षा ठेवीच्या विविध योजनेत चढ्या दराने व्याज दिले जाणार असल्याची जाहिरात करण्यात आली. अन्य बँकांमध्ये सुरक्षा ठेवीवर ९ ते १० टक्के व्याज दिले जाते. मात्र येथे १३.५ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळे अनेक ग्राहकांनी तेथे धाव घेतली. अनेकांनी डेली कलेक्शनचे खाते उघडले. त्यातूनच एका डॉक्टरने २६ लाख रूपये या बँकेत गुंतवले. तसेच सेवानिवृत्त उपकोषागार अधिकाऱ्याने आठ लाख, एका शेतकऱ्याने दोन लाख, एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवस्थापकाने तीन लाख अशी शेकडो ग्राहकांनी रक्कम गुंतवली. मात्र पूर्वसूचना न देता १० दिवसांपासून या बँकेला टाळे लावले आहे. ही बाब बँकेत आर्थिक व्यवहारासाठी गेलेल्यांच्या लक्षात आली. चौकशी केली असता कर्मचारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. त्यानंतर काहींनी पोलिसात धाव घेतली. प्रकाश डब्बावार आणि रामचंद्र राऊत दोन ग्राहकांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेत २३ जूनपर्यंत वाट पाहू, त्यानंतर मात्र कठोर भूमिका घेण्याची तयारी दर्शविली आहे. ग्राहक पैशाची मागणी करीत असल्याने बँकेचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी आणि दैनिक ठेव अभिकर्ता दहशतीत आले आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यामध्ये १३ जून २०१४ पासून बँक बंद आहे. २३ जुनपासून बँक पूर्ववत उघडली जाणार आहे. वरिष्ठांच्या तोंडी सूचनेनुसार ही बँक तत्काळ बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकाच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बँकेचे स्थानिक आठ कर्मचारी आणि १३ अभिकर्त्यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या तरी बँकेचे खातेदार, ग्राहक, कर्मचारी, दैनिक अभिकर्ता असे सारेच दहशतीत आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
‘बीएचआर’च्या ठेवीदारांना हादरा
By admin | Updated: June 23, 2014 00:19 IST