विठ्ठल कांबळे - घाटंजीयवतमाळसारख्या मागास जिल्ह्यात जन्माला आलेल्या भूषण राठोड नामक विद्यार्थ्याने नौदलात गगनभरारी घेतली आहे. अवघ्या २२ व्या वर्षी त्याची सब लेफ्टनंट म्हणून निवड झाली. त्याच्या या यशाने त्याचाच नव्हे तर जिल्ह्याचाही नावलौकिक झाला आहे. घाटंजी येथील भूषण प्रेमदास राठोड असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. घाटंजी येथील श्री समर्थ विद्यालयात त्याचे इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर त्याने आपल्या आई-वडिलांकडे सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्याचा सातारा येथील सैनिक शाळेत प्रवेश घेण्यात आला. तेथे इयत्ता सहावी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण भूषणने पूर्ण केले. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परीक्षेत तो गुणवत्ता यादीत आला. त्यामुळे त्याला एनडीएच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाला बेस्ट आॅल राऊंड कॅडेट म्हणून एनडीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची बॅचलर आॅफ कॉम्प्युटर सायन्सची पदवी मिळविली. गेल्यावर्षी केरळ राज्यातील इंडीयन नेव्हल अकॅडमी एझीमला येथे एक वर्षाचे नौदल प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणातील सर्वच गोष्टीत भूषण गुणवत्तेत आला. त्यामुळे आयएनएच्या पासिंग आऊट परेडमध्ये भूषणचा त्याच्या आई-वडिलांसह सत्कार करण्यात आला. वयाच्या २२ व्या वर्षी सब लेफ्टनंट म्हणून भारतीय नौदलात भूषण दाखल झाला आहे. त्याच्या या यशाने कुटुंबाचेच नव्हे तर जिल्ह्याचा नावलौकिक वाढला असून, मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया भूषणच्या आई-वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
भूषणची अवघ्या २२ व्या वर्षी नौदलात गगनभरारी
By admin | Updated: December 7, 2014 22:59 IST