तंटामुक्त गाव : शिक्षकाच्या प्रयत्नाला गावकऱ्यांची साथ प्रकाश लामणे पुसदपूर्वी ग्रामीण जनतेचा शिक्षकांवर मोठा विश्वास असायचा. गुरुजी म्हणजे गावाचे दैवतच असाचे. काळ बदलला, शिक्षकांवरील विश्वास कमी झाला. मात्र आजही अनेक शिक्षक आपल्या कृतीतून हा विश्वास कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहे, असाच काहीसा अनुभव बेलोरा येथे येतो. आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकाने गावात तंटामुक्त मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. पाहता पाहता गाव तंटामुक्त झाले. एवढेच नाही तर सात लाखांचा पुरस्कारही मिळाला. गावकऱ्यांच्या प्रयत्नाने आज पुसद तालुक्यातील बेलोरा तंटामुक्त गाव म्हणून ओळखले जाते.पुसद तालुक्यातील बेलोरा हे दहा हजार लोकवस्तीचे गाव. सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. २००८ मध्ये तालुक्यातील शेंबाळपिंपरी व मोहा इजारा ही दोन गावे तंटामुक्त झाली. याच गावाचा आदर्श घेऊन आपले गावही तंटामुक्त करण्याचा गावकऱ्यांनी निर्धार केला. आदर्श शिक्षक मारकड गुरुजी यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ३५ सदस्यीय समिती स्थापन झाली. आयुष्यभर विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या मारकड गुरुजींनी कधी काळी आपले विद्यार्थी असलेल्या तरुणांना एकत्र आणले. आपल्या उपजत कौशल्यावर त्यांनी तरुणांची मने जिंकली. आदर्श गाव करण्यासाठी तंटामुक्त मोहीम राबविणे कसे गरजेचे आहे, हे पटवून दिले. शिक्षकांवर असलेला ग्रामीण जनतेचा विश्वास येथेही कामी आला. गावकरी कामाला लागले. कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे धडे दिले जाऊ लागले. गावातील अवैध धंदे बंद झाले. गावात जातीय सलोखा निर्माण झाला. सण-उत्सव खेळीमेळीच्या वातावरणात साजरे होऊ लागले. गावातील वाद गावातच मिटविल्या गेले. या सर्वांचा परिणाम चांगला झाला. गाव तंटामुक्त म्हणून शासनाने घोषित केले. २००९ मध्ये शासनाचा सात लाख रुपयांचा पुरस्कार बेलोराला प्राप्त झाला. आताही गावात तंटामुक्त मोहीम राबविण्यासाठी गावकरी परिश्रम घेत आहे. सण-उत्सव एकोप्याने साजरेमहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सण-उत्सव एकोप्याने साजरे करण्याला अत्यंत महत्व आहे. सण-उत्सवच अनेकदा वादाचे कारण ठरते. मात्र तंटामुक्त गाव मोहिमेनंतर अनेक गावातील सण-उत्सव पोलीस बंदोबस्ताशिवाय होऊ लागले. २००७ पासून सुरू झालेल्या या मोहिमेने पोलिसांवरील ताण कमी केला. आजही अनेक गावात एक गाव एक गणपती, कोणत्याही मिरवणुका पोलीस बंदोबस्ताशिवाय काढल्या जातात. कुठेही वाद होत नाही. वाद झाल्यास तर गावात मिटविला जातो. तंटामुक्त पुरस्कारासाठी सण-उत्सव पोलीस बंदोबस्ताशिवाय साजरे केल्यास ३० गुणही आपोआप समितीच्या पदरी पडतात.
अन् बेलोराने मिळविला सात लाखांचा पुरस्कार
By admin | Updated: June 8, 2015 00:01 IST