पिंपरी इजारातील प्रकार : प्रेत सोडून सैरावैरा धावत सुटले गावकरी, सायंकाळी झाला अंत्यसंस्कारआरिफ अली - बाभूळगाव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे निघालेल्या अंत्ययात्रेतील लोकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्याने घाबरलेल्या नागरिकांनी प्रेत सोडून सैरावैरा धाव घेतली. तब्बल दोन किलोमीटरपर्यंत मधमाश्यांनी पाठलाग केला. या हल्ल्यातून बचावसाठी काहींनी चक्क विहिरीत उड्या घेतल्या. हा प्रकार बाभूळगाव तालुक्यातील पिंपरी इशारा येथे शनिवारी दुपारी घडला. मधमाशा शांत झाल्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. बाभूळगाव तालुक्यातील पिंपरी इजारा येथील जानराव रतन डेंबरे (६०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शनिवारी अंत्यसंस्काराची तयारी झाली. बाहेरगावाहून नातेवाईक आणि गावातील आप्तस्वकीय गोळा झाले. दुपारी अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. मात्र अर्धेअंतर पार करीत नाही तोच एका वृक्षावरील पोळातून उठलेल्या मधमाश्यांनी अचानक अंत्ययात्रेवर हल्ला केला. या प्रकाराने घाबरलेल्या आप्तस्वकीय आणि नागरिकांनी प्रेत तिरडीसह रस्त्यात सोडून सैरावैरा पळ काढला. मात्र मधमाशा पाठ सोडत नव्हत्या. तब्बल दोन किलोमीटर मधमाश्यांनी अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांचा पाठलाग केला. दरम्यान जीव वाचविण्यासाठी काहींनी रस्त्यालगतच्या शेतातील विहिरीत उड्या घेतल्या. या मधमाशांच्या हल्ल्यात मृत जानरावचा मुलगा संतोष जानराव डेंबरे, लहान भाऊ दिलीप रतन डेंबरे यांच्यासह प्रभा लखूपती बेंडे, सुवालाल पुनाजी तितगाव गंभीर जखमी झाले. या सर्वांच्या चेहऱ्यावर मधमाशांनी हल्ला केला.हा प्रकार गावात माहीत होताच खळबळ उडाली. परंतु कुणाचीही हिंमत प्रेतापर्यंत जाण्याची होत नव्हती. इकडे माशांनी डंख मारल्याने प्रचंड वेदना होत असल्याने जखमींना तत्काळ बाभूळगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. चेहऱ्यावर माशांचे शेकडो डंक होते. विशेष म्हणजे या माशा आग्या मोहळाच्या असल्याचे दिसून आले. इकडे प्रेत अर्ध्यातच होते. मात्र माशांच्या घोंगावण्यामुळे कुणाचेही तिकडे जाण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी सायंकाळी मधमाशा शांत झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मधमाशा एवढ्या कशा धावून पडल्या हे मात्र कळायला मार्ग नाही. गावात यापूर्वी असा कधीच प्रकार घडला नसल्याचे वयोवृद्ध जानकार सांगतात. सध्या जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी गावात मात्र अंत्ययात्रेवर मधमाश्यांच्या हल्ल्याचीच चर्चा दिसत आहे.
अंत्ययात्रेतील लोकांवर मधमाश्यांचा हल्ला
By admin | Updated: October 5, 2014 23:12 IST