गजानन अक्कलवार कळंबकळंब बाजार समितीची निवडणूक नुकतीच जाहीर झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा हे चार पक्ष युती करून बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी मैदानात आहे. तसे पाहिले तर ही बाजार समितीच डबघाईस आली आहे. असे असतानाही केवळ प्रतिष्ठेसाठी चारही पक्ष कामाला लागले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. परंतु येथील बाजार समिती शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे हित जोपासत असल्याचे खासगीमध्ये बोलले जायचे. असाच सूर विरोधी सोबतच सत्तारुढ संचालकांचाही होता. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणी आवाज उठवला असे कधी झाले नाही. विशेष म्हणजे विरोधी संचालकांनीही कधी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आक्रमण भूमिका घेतली हेही पाहायला मिळाले नाही. मागील पाच ते सहा वर्षामध्ये बाजार समितीचे उत्पन्न पाहिल्यास त्यामध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील बाजार समितीला उतरती कळा लागल्याचे बोलले जाते. दोन डझनाहून अधिक व्यापाऱ्यांची नोंद या ठिकाणी आहे. परंतु हर्रासावर केवळ दोन ते तीन व्यापारीच बोलीसाठी हजर असतात. व्यापाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे ते संगनमत करून भाव पाडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल हर्रासावर मोठी पिळवणूक होत असल्याची ओरड अनेकदा होते. या प्रकाराविरूध्द बाजार समिती प्रशासनाने कुठलीही ठोस पावले उचलल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात असणाऱ्या गटाला मतदारांनी जाब विचारण्याची हिच खरी वेळ आहे. सत्तारुढ गटाने मागील काळात शेतकऱ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करीत केवळ बांधकाम व कर्मचारी भरतीवर लक्ष केंद्रित केले होते. बांधकामासाठी घेतलेले लाखो रुपयाचे कर्ज बाजार समितीवर आहे. कर्जाचा हप्ता भरता-भरता बाजार समितीला नाकीनऊ येत आहे. शेतकऱ्यांसाठी असलेला शिदोरी मंडप केवळ नावापुरताच आहे. त्याठिकाणी कुठलीही सुविधा नाही. परिसर स्वच्छतेकडे बाजार समितीचे पार दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचीही ओरड होत आहे.कृषी मालाची परस्पर अवैध खरेदीकळंब शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन, तूर, चना आदी शेतमालाची खासगी व्यापाऱ्यांकडून अवैध खरेदी केली जाते. काही संचालकही अवैध खरेदीच्या व्यवहारात गुंतले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. या प्रकारामुळे लाखो रुपयंचा सेस बुडविला जातो. त्यामुळेच बाजार समितीच्या नफ्यामध्ये घसरण होत आहे. बाजार समितीला तोटा तर व्यापारी नफा कमवित आहे. त्यामुळे बाजार समिती डबघाईस आली आहे. हे सर्व थांबवून बाजार समितीला उभारी देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे शेतकरी हिताला प्राधान्य देणे गरजेचे आहे. याकडे नव्याने नियुक्त होणाऱ्या संचालक मंडळाने लक्ष देण्याची गरज आहे. एवढेच नाही तर, मतदारांनीही आता सजग होण्याची गरज आहे. संचालकांची चुप्पी चर्चेचा विषय कळंब शहरात कापूस व धान्याची खुलेआम अवैध खरेदी केली जाते. हा प्रकार शेतकरी व नागरिकांना दिसत असताना पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना दिसू नये, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जाते. या प्रकाराविरोधात आवाज न उठविता चुप्पी साधण्यात संचालक मंडळाचे काय हित आहे, हे न समजण्याइतके नागरिक भोळे नाही. त्यामुळे यापुढे असे प्रकार होऊ नये, यासाठी मतदारांनी निवडणुकीत उभ्या असणाऱ्या लोकांकडून ठोस आश्वासन घेण्याची गरज आहे. बाजार समितीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर सेस वाढविण्याकडे व शेतकऱ्यांच्या सुविधेकडे लक्ष देण्याची गरज आहे, यासाठी आता मतदारांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे.
डबघाईस आलेल्या संस्थेसाठी प्रतिष्ठेची लढाई
By admin | Updated: May 23, 2016 02:33 IST