स्वयंसेवी संस्थेची तक्रार : वणी पोलिसांची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील प्रेमनगर परिसरातील एका घरात अल्पवयीन मुलींकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेतल्या जात असल्याची तक्रार प्राप्त होताच, जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशावरून वणी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी स्थानिक सदर घरावर धाड टाकून दोन बांग्लादेशी पिडीत महिलांची सुटका केली. याप्रकरणी देहविक्री करवून घेणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक प्रेमनगर परिसरातील एका घरात अल्पवयीन मुलींकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेतला जात असल्याची तक्रार नागपूर येथील फ्रीडम फर्म या स्वयंसेवी संस्थेने पोलिसांकडे केली होती. त्याची दखल घेत वणीचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सापळा रचला. यावेळी फ्रीडम फर्म या संस्थेचे पदाधिकारीही पोलिसांच्या सोबत होते. सर्वप्रथम या पदाधिकाऱ्यांपैैकी एकाला बनावट ग्राहक बनून एका संबंधित घरात पाठविण्यात आले. त्या ग्राहकाकडून माहिती मिळताच, पोलिसांनी पंचासह सदर घरावर धाड टाकली. त्यावेळी दोन बांग्लादेशी महिला तेथे देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या महिलांना विचारणा केली असता, सदर घराची मालकीन आमच्याकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करायला लावत होती, असे पिडीत महिलांनी पोलिसांना सांगितले. त्यातून मिळालेल्या पैैशात ती स्वत:ची उपजिविका करीत होती, अशी माहिती पिडीत महिलांनी पोलिसांना दिली. या कारवाईत पोलिसांनी पिडीत बांग्लादेशी महिलांची सुटका केली, तर देह विक्रीचा व्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेविरुद्ध कलम ३, ४, ७ अनैैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे, पोलीस उपनिरीक्षक अशोक काकडे, जमादार अरूण नाकतोडे, वसंत चव्हाण, आनंद अल्चेवार, डी.बी.पथकातील नायक पोलीस शिपायी शेख नफीस, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, विकास धडसे, दिलीप जाधव दीपक, वाड्रसवार, रंजीत बन्सोड, महिला पोलीस शिपाई कौशल्या, कुमरे, वैैशाली खिरटकर, वाहन चालक बाळू गवारकर यांनी पार पाडली. यापूर्वीदेखील या परिसरात आंध्रप्रदेशातील पोलिसांनी धाड टाकून अनेक महिलांची सुटका केली होती.
प्रेमनगरातून बांग्लादेशी महिलांची सुटका
By admin | Updated: June 2, 2017 01:49 IST