उमरखेडच्या डॉक्टरांची माणूसकी : सर्पदंशानंतर तातडीने मोफत उपचारअविनाश खंदारे उमरखेड ती अवघी १३ वर्षांची. घरच्या गरिबीमुळे कापूस वेचायला गेली अन् घात झाला. असली कोब्रा नागाने तिला दंश केला. उपचारासाठी पैसाही नव्हता आणि वेळही नव्हता. मात्र उमरखेडमधील माणूसकी जपणाऱ्या डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन तिचे प्राण वाचविले. उपचार, औषध आणि पॅथॉलॉजीचे ५० हजारांचे बिल माफ केले. ऐन भाऊबिजेच्या दिवशी घडलेल्या या प्रकाराने सामाजिक सौहार्द जपण्यासोबतच एका गरीब बहिणीला ओवाळणीत चक्क जीवदानच दिले. मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या या बहिणीचे नाव सीमा हरुण शेख (१३) असून ती निंगनूरला राहते. लहान असतानाच मातृछत्र हरपले. घरची परिस्थिती हलाखीची आहे. रोजमजुरी करूनच सीमा शेख उदरनिर्वाह करते. सोमवारी कापूस वेचणीसाठी ती शेतात गेली होती. सकाळी १०.३० च्या सुमारास कापूस वेचत असताना असली कोब्रा नागाने तिला दंश केला. सीमाची आरडाओरड ऐकून आजूबाजूचे शेतकरी आणि मजूर महिला धावून आल्या. उपस्थितांनी तो नाग स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला. सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. सीमासह सर्वांनीच घटनास्थळावरून पळ काढला. हे सर्व जण फुलसावंगी-ढाणकी रोडवर येऊन एखाद्या वाहनाची वाट पाहत बसले. मात्र कोणतेच वाहन मिळत नव्हते. तेवढ्यात फुलसावंगी येथील सामाजिक कार्यकर्ते कय्याम नवाब आपल्या शेताकडे निघालेले असताना त्यांना ही गर्दी दिसली. त्यांनी विचारपूस करताच सर्पदंश झाल्याचे कळले. तोपर्यंत सीमा शेखच्या डोळ्यापुढे अंधारी आणि तोंडाला फेस येऊ लागला होता. तत्काळ तिला क्रूझर गाडीने अवघ्या ४० मिनिटात उमरखेडपर्यंत आणले. डॉ. श्रीकांत जयस्वाल यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सीमाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सोमवारी सकाळी ११.३० पासून मंगळवारच्या दुपारपर्यंत सातत्यपूर्ण प्रयत्न करून डॉक्टरांनी सीमाचे प्राण वाचविले. यासाठी डॉ. श्रीकांत जयस्वाल, डॉ. संदीप वानखडे, डॉ. शेख मोहंमद गौस, डॉ. स्वप्नील अग्रवाल, डॉ. सारिका वानखडे यांनी उपचार केले. विशेष म्हणजे या उपचारासाठी आवश्यक औषधी विद्यांचल फार्मा यांनी मोफत दिली. पॅथॉलॉजीचे दीपक ठाकरे यांनीही बिलाचे पैसे घेतले नाही. डॉक्टरांनी देखील उपचाराचा कोणताही खर्च मागितला नाही. बहिणीला मिळाले भाऊसीमा हरुण शेख ही केवळ दीड महिन्याची असतानाच तिची आई मरण पावली. वडिलांची परिस्थिती हलाखीची आहे. अशातच सर्पदंश झाल्यानंतर तिला कोण वाचविणार, उपचारासाठी पैसा कोठून येणार हे प्रश्न होते. परंतु उमरखेडमधील सुज्ञ डॉक्टर, औषध विक्रेता आणि पॅथॉलॉजी चालक हे ऐनवेळी सीमाच्या पाठीशी सख्ख्या भावासारखे उभे राहिले. भाऊबिजेच्या दिवशीच एका गरीब बहिणीचा जीव वाचवून उमरखेडवासीयांनी आगळी भाऊबिज साजरी केली. हिंदूंनी केली प्रार्थनानिंगनूर येथून सीमा शेख हिला उमरखेड येथे उपचारासाठी आणण्यात आले. तिची प्रकृती गंभीर होती. यावेळी रुग्णालयात असलेले इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी सीमासाठी देवाकडे प्रार्थना केली. जातीपातीच्या भिंती बाजूला सारत सीमासाठी सर्व जण प्रार्थना करीत होते. या घटनेने उमरखेडमध्ये माणुसकीचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचाही प्रत्यय आला.
सीमा शेखला भाऊबीज ओवाळणीत जीवदान
By admin | Updated: November 2, 2016 01:01 IST