गंगाधर बनबरे : बळीराजा व्याख्यानमालेचे पहिले पुष्प, शिवाजी महाराज ‘लोकराजे’वणी : देशातील बहुजन तरूणांनी शिवाजी महाराजांची विचारधारा आत्मसात करून प्रशासनातील सत्तास्थाने काबीज कावी. तेव्हाच पुन्हा या देशात रयतेचे राज्य प्रस्थापित होईल, असे मौलिक विचार पुणे येथील साहित्यिक व विचारवंत गंगाधर बनबरे यांनी शनिवारी व्याख्यानातून मांडले. येथील शिव महोत्सव समितीतर्फे आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे पहिले पुष्प त्यांनी ‘लोकराजा शिवाजी महाराज’ या विषयावर गुंफले. वरोरा मार्गावरील एका लॉनमध्ये आयोजित या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी शिक्षण संस्था मारेगावचे अध्यक्ष जीवन कापसे होते. मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी माधव गिरी, नगराध्यक्ष करूणा कांबळे, डॉ.रमेश सपाट, डॉ.शांताराम ठाकरे, डॉ.सुनील जुमनाके, डॉ.सुरेश बलकी, डॉ.पूर्ती राणे, किशोर राऊत उपस्थित होत्या. जयंत कुचनकार यांच्या बालसंचाने प्रथम जिजाऊ वंदना गायिली. प्रास्ताविक अॅड. नीलेश चौधरी यांनी केले. माधव गिरी यांनी शिवाजींच्या जीवनातील काही प्रसंग सांगून शिवाजींच्या चरित्राचा अभ्यास करण्याची आज का गरज आहे, हे पटवून दिले. पहिले पुष्प दिवंगत बाबाराव ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रसाद ठाकरे यांच्या सौजन्याने पार पडले. गंगाधर बनबरे यांनी आपल्या एका तासाच्या व्याख्यानातून शिवाजींचा जीवनपट, त्यांच्या शौर्यगाथांची मांडणी केली. आजची बिघडलेली समाज व्यवस्था व राज्य व्यवस्था ताळ्यावर आणण्यासाठी शिवाजींच्या विचारांची किती गरज आहे, हे त्यांनी पटवून दिले. जनतेला अजूनही ९० टक्के शिवाजी समजलेच नाही. ते समजावून देण्याची व्यवस्थाही प्रशासनाजवळ नाही. जनतेला शिवाजी समजू नये म्हणून त्यांची साधने नष्ट करण्यात आली. या महान राज्यकर्त्यांची प्रतिमादेखील आपल्या देशात उपलब्ध नव्हती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आज शिवाजीचा वापर केवळ जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी होत आहे. हिंदू-मुस्लिम दंगलीमध्ये ‘रॉ मटेरीयल’ म्हणून बहुजन समाजाला वापरले जात आहे. ‘बोले तैसा न चाले, त्याची तोडावी पाऊले’, अशी वेळ आता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी हे जगाला दिशा देणारे राजे होते. जो शिवाजी वाचतो, तो कधीही गुलाम होऊ शकत नाही. शेतकऱ्यांचे हित जोपासणारे पहिले राजे शिवाजी होते. आज ज्यांच्या जणुकांमध्ये शिवाजी, फुले, बुद्ध, महावीर आहे, तेच शेतकरी आत्महत्या करताहेत. यावर गंभीरपणे चिंतन झाले पाहिजे. कृषिप्रधान देशाचे सरकार ७६ टक्के शेतकऱ्यांवर कधीही स्वतंत्र बजेट सादर करीत नाही, तर उद्योजकांना अधिक नफा मिळवून देणारे औद्योगिक बजेट सादर केले जाते, अशी खंत बनबरे यांनी व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)महिलांना रोजगाराची संधी दिलीमहिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांनी लाख रूपयापर्यंत वेतन महिलांना दिले. महिलांना संरक्षण देणारा राजा शिवाजी होता. त्यामुळे आजच्या बालकांना शिवाजी, फुले, गाडगे महाराज, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची लस देऊन त्यांना तरूणपणी वैदीक वर्ण व्यवस्थेविरूद्ध लढण्याची ताकद निर्माण करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. ‘तुझे आहे तुजपाशी, परी जागा चुकलाशी’ हे तुकाराम महाराजांनी सांगितलेच होते. म्हणून शाहीर अमरशेख म्हणतो ‘आजही हवा मज माझा शिवबा’, असे त्यांनी स्पष्ट केले.
बहुजनांनी सत्तास्थाने काबीज करावी
By admin | Updated: November 2, 2015 01:50 IST