पाटीपुऱ्यातील प्रकरण : दोघांचा शोध सुरू यवतमाळ : पाटीपुरा येथील युवकाच्या खुनातील आरोपीने शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी आत्मसमर्पण केले. प्रणय खोब्रागडे याचा सोमवारी सकाळी खून करून चार आरोपी पसार झाले होते. सुमित उर्फ बाको बाबूसिंग बैस (२२) रा. बेंडकीपुरा असे आत्मसमर्पण करणाऱ्या आरोपीेचे नाव आहे. खुनाच्या घटनेनंतर सुमित पसार झाला होता. त्याचा एक सहकारी तुषार उर्फ पोकर रणजित मेश्राम याला अत्यवस्थ अवस्थेत टोळीविरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. प्रणयवर हल्ला करताना चाकूचा घाव तुषारच्या उजव्या हातावर बसला. यात त्याच्या हाताची नस कापली गेली. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पळून जाण्याचे त्राण त्याच्या शरीरात उरले नाही. पोलिसांनी त्याला गंभीर अवस्थेत ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. तुषारसोबत असलेला सुमित उर्फ बाको बैस याने पळ काढला. मात्र पुढे जाणार कुठे, हा प्रश्न असल्याने त्याने शेवटी शहर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. या गुन्ह्यातील अंकुश दामोदर रामटेके (३५), रिंकू अजय रामटेके (१९) हे दोन आरोपी पसार आहेत. पोलीस या आरोपींच्या मागावर आहेत. कधीकाळचा मित्र असलेल्या प्रणयचा खून करण्यामागे नेमके कोणते कारण आहे, याची चौकशी अटकेतील आरोपींकडे करण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
खुनातील आरोपी बाको अखेर पोलिसांना शरण
By admin | Updated: November 2, 2016 00:53 IST