लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोशल मीडियावर अनन्यासिंग ओबेरॉय या मॉडेलच्या नावाने हायप्रोफाईल व्यक्तींना गंडा घालणाऱ्या संदेश अनिल मानकर या ठगाला आश्रय देणारी दारव्हा रोडवरील कुंटणखाना चालक ऑन्टी पसार झाली आहे. संदेश हा सुरुवातीला एका हॉटेलात प्लेट धुण्याचे काम करीत होता. नंतर तो दूरची नातेवाईक असलेल्या कुंटणखाना चालक ऑन्टीच्या संपर्कात आला. तो पूर्णवेळ त्या कुंटणखान्यावर राहत होता. तिथेच त्याने व्यवसाय करणाऱ्या महिला, मुली ग्राहकांशी कसा संवाद साधतात हे ग्रहण केले. काम नसल्याने तो पूर्णवेळ मोबाईलवर राहून अनन्यासिंग ओबेरॉय हिच्या नावाचे अकाऊंट ऑपरेट करीत होता. या अकाऊंटवर तो अनन्यासिंग हिला हायप्रोफाईल मॉडेल दाखविण्याचा प्रयत्न करीत होता. यासाठी तो विविध प्रकारचे फोटो प्रोफाईलवर शेअर करीत होता. यात त्याला पुरेपूर यश मिळाले. अनेक उच्चभ्रू व्यक्ती सोशल मीडियावर अनन्यासिंगच्या फ्रेन्डलिस्टमध्ये समाविष्ट झाल्या. यातून त्याने मैत्री वाढवत नेली. व्यावसायिक व्यक्तींमध्ये मध्यस्थाची भूमिकाही त्याने बजावली आहे. दिल्लीतील डॉक्टर पूर्वी संदेशने दोघांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. ८३ लाखांची रोख घेऊन निघालेला व्यावसायिक मधातच पोलिसांच्या हाती लागला. तर एकाकडून दोन लाख रुपये येणार असतानाच काम बिचकले. त्यानंतर संदेश अतिशय सावध राहू लागला, त्याने दिल्लीच्या डॉक्टरसोबत केवळ निखळ मैत्री कायम ठेवली. त्यात कुठेही अश्लीलता व लैंगिकता येऊ दिली नाही. यातूनच मैत्रीचे भावनिक नाते तयार झाले. डॉक्टरकडून भेट स्वरूपात घेतलेले दागिने विकण्यासाठी संदेश नागपुरात गेला होता. तेथे त्याने दागिने विकून दोन लाख रुपये किंमतीचा महागडा मोबाईल खरेदी केला. आता तो आणखीच सराईतपणे अनन्यासिंग या मॉडेलचे सोशल मीडिया अकाऊंट हाताळू लागला.
मोबाईलच्या एसडीआर, सीडीआरनुसार पोलीस तपास - पोलिसांनी या प्रकरणात संदेशने कुणाला गंडा घातला याचा शोध घेत आहे. केवळ संदेशच्या जबाबावर पोलीस संतुष्ट नसून दुसरी बाजूही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी मोबाईलवर आलेले कॉल, सोशल मीडियावर केलेली चॅटींग यासह इतर सर्व प्रकारचा तपास केला जाणार आहे. याकरिता एसडीआर, सीडीआर ताब्यात घेण्यात आला आहे. याची पडताळणी करून चौकशी केली जाणार आहे.