मोहन वाघमारे खून प्रकरण : जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती यवतमाळ : येथील कोल्हे ले- आऊटमधील मोहन वाघमारे यांच्या खुनात त्यांचा मेव्हणाच मारेकरी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्याने मित्राच्या मदतीने सतत त्रास देणाऱ्या जावयाचा खून केल्याची कबुली दिल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत सांगितले. विनायक भगवान भवरे (३८) रा. बोरी गोसावी, असे अटक करण्यात आलेल्या मेव्हण्याचे नाव आहे. त्याला दत्ता फत्तू राठोड (३८) रा. बोरी गोसावी याने खून करण्यासाठी मदत केली. या दोन्ही आरोपींनी २३ फेब्रुवारीच्या रात्री मोहन वाघमारे यांच्या घरात छतावरून प्रवेश केला. तेथे त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून ठार केले. ही घटना २७ फेब्रुवारीला उघडकीस आली. नंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सुरूवातीपासून विनायक भवरेवर पोलिसांना संशय होता. हा खून मालमत्ता व कौटुंबिक कलहातून झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी विनायकला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून दोघांना अटक करण्यात आल्याचे एम. राज कुमार यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, वडगाव रोडचे ठाणेदार देविदास ढोले स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर, श्रीकांत जिंदमवार व पथकाने पूर्ण केला. पुढील तपास देविदास ढोले करीत असल्याचे त्यांनी सांगितले. फुलसावंगी दरोडा प्रकरणात कुख्यात बाबर टोळीचा सहभाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यातील एक आरोपी पसार असून त्याला लवकरच अटक करणार असल्याचे परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, एसडीपीओ पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी) पांढरकवडा पोलिसांच्या सतर्कतेने गवसली चिमुकली पांढरकवडा येथील चंद्रशेखर वॉर्डातून बुधवारी दुपारी दोन वर्षाची चिमुकली बेपत्ता झाली. सायंकाळी तक्रार मिळताच पोलिसांनी शोध सुरू केला. विविध पथकांचे गठन करून श्वान पथकांची मदत घेऊन शोध सुरू होता. सदर मुलीचे छायाचित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. या दबाव तंत्रामुळे अज्ञात आरोपीने सदर चिमुकलीला केळापूर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर आणून सोडले. ही मुलगी शुक्रवारी सकाळी तेथे एकटीच बेवारस फिरताना काही नागरिकांना आढळली. त्यांनी तिला घेऊन आजूबाजूला चौकशी केली. तेथे एका मॅकेनिकने ती बेपत्ता असल्याचा सोशल मीडियावरील मॅसेज दाखविला. त्यावरून मुलीला घेऊन त्यांनी पांढरकवडा ठाणे गाठले. केवळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे ४८ तासात ही चिमुकली सुखरूप मिळाली आहे. पांढरकवडाचे उपविभागीय अधिकारी आणि ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या प्रयत्नामुळे चिमुकली गवसली. अपहरणकर्ते टप्प्यात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मेव्हणाच निघाला जावयाचा मारेकरी
By admin | Updated: March 4, 2017 00:56 IST