यवतमाळ : नगरपरिषदेने प्रथमच ऐतिहासिक निर्णय घेतला. मालमत्ता कराची वसुली वाढविण्यासाठी थकबाकीवरील व्याज माफ करण्याचा ठराव सर्वसाधारण सभागृहात घेण्यात आला. या ठरावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले आहे. यामुळे आता यवतमाळकरांच्या मालमत्ता करावरचे दीड कोटींचे व्याज माफ होणार आहे. परंतु हा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपूर्वी कराचा भरणा करण्याची अट ठेवण्यात आली आहे.शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकीत होता. नियमाप्रमाणे या करावर व्याज आकारण्यात आले होते. परिणामी करापोटी वसुलपात्र रक्कमही ११ कोटींच्या घरात दिसत होती. या तुलनेत प्रत्यक्ष कर वसुली मात्र केवळ तीन ते चार कोटी इतकीच होत होती. चालू वर्षातील कर वगळता थकबाकीचा आकडा मोठा होता. ही तफावत दूर करण्यासाठीच नगराध्यक्ष सुभाष राय आणि मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांनी नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १६७ नुसार व्याज माफी करण्याचा प्रस्ताव सभागृहापुढे ठेवला. हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्यानंतर त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजूरीसाठी ठेवण्यात आले. कर वसुली वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सकारात्मक निर्णय देत हा प्रस्ताव मंजूर केला. आता ३१ मार्चपूर्वी या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला. त्यांना थकीत करावरील व्याज माफ केले जाणार आहे. यातून नगरपरिषदेच्या कर वसुलीची टक्केवारीसुद्धा वाढणार आहे. अप्रत्यक्षरीत्या उत्पन्नात भर टाकण्यासाठीच हा ठराव घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांनी सांगितले. आता याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी)
व्याजमाफीच्या ठरावाला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी
By admin | Updated: February 9, 2015 23:20 IST