यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या पेपरफुटीच्या प्रकरणात आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी सुरू असून, अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी या प्रकरणातील अन्य एक संशयीत अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. भावाला नोकरीवर लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत विस्तार अधिकारी विक्रांत राऊत याने परीक्षा सुरू असताना केंद्राबाहेर पेपर पाठविला. तसेच त्याची उत्तरे एका तज्ञामार्फत मिळवून ती परीक्षार्थी भावाला देण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याचा डाव ऐनवेळी फसला. दरम्यान विस्तार अधिकारी राऊत याच्या अटकेची कुणकुण लागताच केंद्राबाहेर प्रश्नपत्रिका नेणारा पसार झाला होता. तो त्याचा नातेवाईकच असल्याचे सांगण्यात आले. वडगाव रोड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, कसून चौकशी सुरू आहे. घटनेची कबुली त्याने पोलिसांपुढे दिल्यास कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र वारंवार चौकशीसाठी पाचारण करूनही विस्तार अधिकारी राऊत याचा परीक्षार्थी भाऊ हजर झाला नाही. त्यामुळे संशय असल्याने त्याचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसातून देण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)
पेपरफुटीत आणखी एक संशयित ताब्यात
By admin | Updated: November 29, 2014 02:14 IST